लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : अवैध सावकारी प्रकरणात येथील एका सलून व्यावसायिकाच्या दुकानासह घरावर सहकार विभागाने शुक्रवारी धाड टाकली. त्यावेळी वेगवेगळ््या बँकांचे १२४ पासबुक, २६ एटीएम कार्ड, आठ चेकबुक आणि विड्रॉल स्लिप आढळून आले. वडील आणि मुलाकडून संशयास्पद कागदपत्रे व दस्तवेज जप्त करण्यात आला आहे.सुभाष माधवराव भोरे व विजय सुभाष भोरे रा. श्रीरामपूर असे धाड टाकण्यात आलेल्या अवैध सावकाराचे नाव आहे. सावकारीबाबत शिक्षक रघुनाथ साहेबराव डाखोरे रा. सेवादास नगर, शिक्षक भीमराव हरी तांबारे रा. फेट्रा आणि नारायण महादु सावंत यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. या सावकाराकडून डाखोरे व तांबारे यांनी प्रत्येकी ५० हजार तर सावंत यांनी अडीच लाख रुपये घेतले होते. बँक पासबुक विड्रॉल सिल्प, एटीएम कार्ड गहाण ठेऊन १० टक्के व्याज दराने पैसे उचलले होते. या तिघांनी अनुक्रमे ९० हजार, एक लाख ५५ हजार आणि सात लाख रुपये परतफेड केले. परंतु गहाण ठेवलेले कागदपत्रे परत देण्यास सावकाराने नकार दिला. त्यामुळे जिल्हा निबंधक व सहाय्यक निबंधकांकडे तक्रार दाखल करण्यात आली.त्यावरून शुक्रवारी पुसदच्या आठवडी बाजारातील स्टायलो जेंटस् पार्लर व श्रीरामपूर येथील घरी दोन पथकांनी एकाच वेळी धाड मारली. त्यावेळी अनेक संशयास्पद दस्तवेज जप्त करण्यात आला. त्यात विविध बँकांचे १२४ पासबुक, विविध व्यक्तींच्या नावाने असलेले २६ एटीएम, आठ चेकबुक, स्वाक्षºया केलेले १३ कोरे चेक, ११ विड्रॉल स्लिप, एटीएममधून वेळोवेळी काढलेल्या पैशाच्या स्लिप, विविध व्यक्तींच्या नावे हिशोब लिहलेल्या नोंदवह्या आदींचा समावेश आहे.ही कारवाई सावकाराचे जिल्हा निबंधक गौतम वर्धन, सहाय्यक निबंधक जी.एन. नाईक, सहाय्यक सहकार अधिकारी एम.आर. राठोड, जी.एस. कदम, एस.एस. पिंपरखेडे, शिरीष अभ्यंकर यांच्या पथकासह पोलिसांनी केली. अवैध सावकारी संबंधाने ताब्यात घेतलेल्या दस्तवेजाची चौकशी करून त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पुसद येथे अवैध सावकारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:51 PM
अवैध सावकारी प्रकरणात येथील एका सलून व्यावसायिकाच्या दुकानासह घरावर सहकार विभागाने शुक्रवारी धाड टाकली.
ठळक मुद्देसलून व्यावसायिक : १२४ पासबुक, २६ एटीएम कार्ड, आठ चेकबुक जप्त