लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरू आहे. पुसद तालुक्यासह वणी, झरी जामणी, केळापूरला वादळी पावसाने झोडपले असून, या पावसात वीज कोसळल्याने दोघांंचा मृत्यू झाला आहे. महागाव तालुक्यातील माळकिन्हीत वीज कोसळून गाय ठार झाली. शनिवारी सायंकाळीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पुसद, वणी, झरी जामणी आणि केळापूर तालुक्यात शुक्रवारी व शनिवारीही विविध ठिकाणी पाऊस बरसला. महागाव तालुक्यातील सुधाकरनगर येथे पावसात अंगावर वीज कोसळल्याने पृथ्वीराज काजुलाल राठोड या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी घराकडे परतत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली. घटनेची माहिती मिळताच तलाठी एस.ए. राऊत यांनी पंचनामा करून तहसीलदारांना माहिती दिली. माळकिन्ही येथे रमेश देवराव कलाने यांची गाय वीज अंगावर पडल्याने दगावली. पांढरकवडा तालुक्यातही शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील जोगीनकवडा शेतशिवारात पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली थांबलेल्या चंडकू भीमराव मेश्राम या ३० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. चंडकू मेश्राम हा राजू राठोड यांच्या शेतात टोबणीसाठी सारे पाडत होता. त्याचवेळी पाऊस सुरू झाल्याने त्याने शेजारीच असलेल्या पळसाच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र झाडावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. वर्षभरापूर्वीच चंडकू याचा विवाह झाला होता.
पुसद, वणीमध्ये प्रत्येकी १४ मीमी पाऊस- मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४.५ मीमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात सर्वाधिक १४.५ मीमी, पुसद १४ मीमी, झरीजामणी ११.७ मीमी, केळापूर १० मीमी, घाटंजी ८.१ मीमी, मारेगाव ५.९ मीमी तर महागाव तालुक्यात १.९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मोठ्या पावसाची शक्यता आहे.
बेलोरा परिसरात वादळाने झाडे उन्मळली- पुसद तालुक्यातील माळपठारालाही शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसात बेलोरा परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आठ झाडे उन्मळून पडली. या बरोबरच अनेकांच्या घरावरील टीनपत्रेही उडाले. शिवाजी विद्यालयाचे छप्पर उडून गेले. त्यावरील दगड अंगावर पडल्याने देवानंद होडगीर हे जखमी झाले असून त्यांच्यावर पुसद येथील प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. कैलास मारकड, भारत मारकड, आकाश सोडगीर आदींच्या घरावरील टीनपत्रेही उडाले. त्यामुळे घरात पाणी शिरल्याने अन्न धान्यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
खांब काेसळल्याने वीजपुरवठा खंडित- बेलोरा परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. विजेचे खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे बेलोरासह वाघजळी,पन्हाळा ही गावे रात्रभर अंधारात होती. शनिवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. खंडाळा येथील उपकेंद्रात बिघाड झाल्याने पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागण्याची शक्यता वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती डी.जी. राठोड यांनी जखमी होडगीर यांच्या वडिलांची भेट घेऊन आर्थिक मदतीची ग्वाही दिली. सपरंच रुपाली पोले, माजी पंचायत समिती सदस्य कल्पना गडदे, धोंडबाराव पोले, जांबुवंत राठोड आदींनी नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, शनिवारी रात्री यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रिमझीम पाऊस सुरू होता. रविवारी जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.