पुसद : येथून वाशिमकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या राज्य मार्गाची पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली आहे. हा संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अपघाताची शक्यता बळावली आहे.
या रस्त्याची काही ठिकाणी संपूर्ण चाळण झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे पावसाचे पाणी पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पुसद-वाशिम मार्गाच्या डांबरीकरण रस्त्याकरिता एका बांधकाम कंपनीला १२० कोटींचे कंत्राट देण्यात आले. मात्र मागील कित्येक दिवसांपासून कंत्राटदाराकडून धीम्या गतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मुरुम टाकल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याची संपूर्ण चाळण झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदून मुरूम टाकला आहे. वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने चालविताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता पूर्णतः उखडला आहे. वाशिम जिल्ह्याची सीमा लागताच रस्ता गुळगुळीत दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. परिणामी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अडगाव फाटा ते मारवाडी फाटा या दोन किलोमीटरच्या रस्त्याची तर अक्षरशः चाळणी झाली आहे.
बॉक्स
खंडाळा घाटात काही ठिकाणी रस्त्याच्या कडा खचल्या आहे. मोठा पाऊस झाल्यास या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे. रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. आदर्शनगर ते लिंबीपर्यंत संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदारावर लक्ष नसल्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे व वाहनधारकांचे हाल होत आहे.
कोट
रस्त्याचे काम योग्य प्रकारे होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कामात कंपनीला अडचण येत आहे. कंपनीचे काम चांगलेच आहे. कंपनीला सूचना दिल्या असता कंपनीने आम्हालाच काम तत्काळ पूर्ण करायचे आहे, असे सांगितले आहे. रस्त्यामुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होते, हे समजू शकतो.
प्रकाश झळके,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुसद