लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपानेसुद्धा पुसदवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोनही पक्षांनी पुसदमध्ये उमेदवार दिल्याने पुसदला जणू राजकीय लॉटरी लागली आहे. पुसदच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन विधान परिषद सदस्य मिळण्याचा योग जुळून आला.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होत आहे. मंगळवारी रात्री काँग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुसद येथील डॉ. वजाहत मिर्झा यांना स्थान देण्यात आले. त्यामुळे रात्रीपासूनच राज्याच्या राजकारणात पुसदची चर्चा सुरू झाली. त्यावरुन काही तास जात नाही तोच पुन्हा पुसदला लॉटरी लागली. भाजपानेसुद्धा आपला विधान परिषदेचा एक उमेदवार निलय नाईकांच्या रुपाने पुसदमध्येच दिला. अचानक एक नव्हे तर चक्क दोन आमदार मिळणार असल्याने पुसदकरांचा उत्साह गगणात मावेनासा झाला आहे.विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधारी व विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास पुसदला अचानक दोन आमदार अतिरिक्त मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांच्या रुपाने पुसद विधानसभा मतदारसंघाला एक आमदार आहेतच. आता त्यात आणखी दोघांची भर पडणार असल्याने एकट्या पुसदमध्ये तीन आमदार पहायला मिळणार आहे. मिर्झा व नाईक यांना मिळालेली विधान परिषदेची ही उमेदवारी संपूर्ण जिल्ह्यासाठी व विशेषत: त्या-त्या पक्षातील दिग्गज नेत्यांसाठी आश्चर्याचा धक्का देणारी आहे.बंजारा समाजाला चारही पक्षात प्रतिनिधीत्वविधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध झाल्यास जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या बंजारा समाजाला चारही प्रमुख पक्षात प्रतिनिधीत्व मिळणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने आधीच या समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. शिवसेनेकडून संजय राठोड, राष्ट्रवादीकडून मनोहरराव नाईक, काँग्रेसकडून हरिभाऊ राठोड हे विधीमंडळात सदस्य आहेत. आता निलय नाईकांना उमेदवारी देऊन भाजपानेही ही पोकळी भरुन काढली आहे. चारही प्रमुख पक्षात बंजारा समाजाला जिल्ह्यात स्थान मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. त्याच वेळी राज्यात लाखोंच्या संख्येने असूनही आम्हाला बोटावर मोजण्याऐवढ्याच जागा का? असा सवालही बंजारा समाजातील घटकांकडून विचारला जात आहे.जिल्ह्यात पाच विधान परिषद सदस्यभाजपाकडून निलय नाईक निवडून आल्यास जिल्ह्यात विधान परिषदेच्या पाचव्या सदस्याची भर पडणार आहे. तानाजी सावंत (शिवसेना), ख्वाजा बेग (राष्ट्रवादी), हरिभाऊ राठोड (काँग्रेस) हे सदस्य आहेतच. माणिकराव ठाकरेंची जागा आता अॅड. वजाहत मिर्झा घेऊ शकतात. मिर्झा व नाईक विजयी झाल्यास परिषदेचे पाच सदस्य जिल्ह्यात होतील. शिवाय विधानसभेचे सात सदस्य आहेतच. या सदस्यत्वाची जिल्ह्यात भाजपाची उणीव होती. निलय नाईकांच्या रुपाने आता तीसुद्धा भरुन निघणार आहे.मोघे-पुरकेंच्या दिल्लीवारीचे फलित तर नव्हे ?जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रृत आहे. येथील पक्षांतर्गत भांडणे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. त्यातूनच यावेळी विधान परिषदेची उमेदवारी कोणत्याही परिस्थिती माणिकराव ठाकरेंना देऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके व जीवन पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली गाठली होती. तेथील मुक्कामात या तिघांनी काँग्रेसचे नवे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खारगे व इतर नेत्यांची भेट घेऊन माणिकरावांच्या विरोधात जोरदार लॉबिंग केल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेच माणिकरावांऐवजी डॉ. वजाहत मिर्झा यांना मिळालेली विधान परिषदेची ही उमेदवारी मोघे-पुरकेंच्या दिल्लीवारीचे तर फलित नव्हे ना, असा सूर काँग्रेसमधून ऐकायला मिळतो आहे.(पुसदमध्ये जल्लोष/-२)उच्चविद्याविभूषित मिर्झा, नाईक यांची राजकीय कारकीर्दजिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्षनिलय मधुकरराव नाईक हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक तसेच विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुतणे आहेत. पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेले निलय नाईक ९० च्या दशकात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांचे काका सुधाकरराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा निलय नाईक हे राज्यातील सर्वात कमी वयाचे (२५ वर्ष) जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्याचवेळी जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला होता. पुष्पावंती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिलेल्या निलय नाईकांनी २००१ मध्ये आपले काका राष्टÑवादीचे नेते मनोहरराव नाईक यांच्याविरुद्ध पुसद विधानसभेची पोटनिवडणूक लढविली होती. त्यावेळी निलय नाईक पराभूत झाले होते. राष्टÑवादी काँग्रेसमध्ये असताना कुटुंबात राजकीय मतभेद झाल्याने निलय नाईक यांनी अलिकडेच अपक्ष म्हणून पुसद विधानसभेची निवडणूकही लढविली होती. मात्र त्यांना विजय संपादन करता आला नाही. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.१३ जिल्ह्यांमध्ये पक्षनिरीक्षकाची भूमिकाडॉ.वजाहत अतहर मिर्झा हे एमबीबीएस असून जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी १३ जिल्ह्यांमध्ये पक्षनिरीक्षकाची धुरा सांभाळली आहे. केंद्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते खासदार गुलामनबी आझाद हे त्यांचे राजकीय गुरु आहेत. ते दहा वर्षे प्रदेश युवक काँग्रेसचे कोषाध्यक्ष, सचिव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राहिले आहेत. स्व.अतहर मिर्झा मेमोरियल ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या विविध शिक्षण संस्था आहेत. मुस्लीम समाजासाठी सामूहिक विवाह सोहळे व अखिल भारतीय उर्दू कवी संमेलनाचे ते नियमित आयोजन करतात.
विधान परिषद निवडणुकीत पुसदला लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 9:43 PM
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपानेसुद्धा पुसदवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोनही पक्षांनी पुसदमध्ये उमेदवार दिल्याने पुसदला जणू राजकीय लॉटरी लागली आहे.
ठळक मुद्देजातीय समीकरणांवर भर : काँग्रेसच्या वजाहत मिर्झांच्या पाठोपाठ भाजपाच्या निलय नाईकांना उमेदवारी