पुसद : शहरातील नागरिकांना रान भाज्यांचे महत्त्व कळावे, आयुर्वेदिक उपयोगिता कळावी व रान भाज्यांचे मार्केटिंग होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने रान भाजी महाेत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रानमेव्याची मेजवानी पुसदकरांना मिळाली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत हा रान भाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. स्थानिक जुन्या पंचायत समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी डाॅ. प्रशांत नाईक, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, तंत्र अधिकारी समाधान धुळधुळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. जयानंद वाढवे, सचिव डाॅ. विश्वास डांगे, डाॅ. उत्तम खांबाळकर, अर्जुन हगवणे, एस.डी. मोरे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील हर्षी, नागवाडी, खडकदरी, हुडी, घाटोडी, बोरी खुर्द, येरंडा, बाळवाडी, येहळा, ज्योतीनगर, जांबबाजार, भंडारी, राजना, पारवा बु., जनुना, हिवळणी, सावरगाव गोरे, म्हैसमाळ, वनवार्ला आदी २० गावातील शेतकऱ्यांनी रानभाज्या, रानफळे, औषधी वनस्पतींसह महोत्सवात सहभाग नोंदविला. टेकुळे, कटुर्ले, सुरकंद, चमकुरा, तरोटा, अंबाडी, चिवळ, रानउंबर, घोळ, नाय, फांज, अंबटचुका, हडसन, फोडणी, चेंच, करवंद, चुचाई, तांदूळकुंदरा, पोखरण, चिलभाजी, पुदीना, उंबर, पाथरी, म्हैसूर आदी ५२ रान भाज्यांची मेजवानी मिळाली.
कोट
पुसद शहरातील नागरिकांना रान भाज्या, रानफळ, आयुर्वेदिक औषधे आदींचे महत्त्व कळावे, त्यांचे मार्केटिंग व्हावे या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
- शुभम बेरड
तालुका कृषी अधिकारी, पुसद