कोरोनामुळे सध्या संचारबंदी लागू आहे. मात्र, सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून तालुक्यात सुरू असलेला हा फिरता जुगार चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अमन’ यापूर्वी पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालवित होता. परंतु, तेथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या धास्तीने त्याने तेथून काढता पाय घेतला. त्याने आता महागाव तालुक्यात आपले बस्तान बसविले आहे. या फिरत्या जुगार अड्ड्याला स्थानिक पोलिसांचे सहकार्य असल्याची चर्चा आहे. महिन्याकाठी ठरावीक मलिदा पोलिसांना पोहोचत असल्याचे सांगितले जात आहे. कधी या गावात, तर कधी त्या गावात हा जुगार सुरू आहे. सध्या कलगाव परिसरात या फिरत्या जुगार अड्ड्याचा डेरा आहे. हाच ‘अमन’ महिनाभरापूर्वी पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौळ येथे जुगार अड्डा चालवित होता. परंतु, तेथे पोलिसांची धाड पडल्याने व तेथील पोलिसांशी ‘वाटणी’वरून वाद झाल्याने सध्या त्याने तालुक्याला केंद्रबिंदू केले आहे. पोलिसांसह इतरांच्या सहकार्याने हा जुगार मोठ्या प्रमाणात चालविला जात आहे.
कोरोनामुळे कडक लॉकडाऊन व जिल्हा बंदी असताना दररोज शेकडो जुगारी या अड्ड्यावर जुगार खेळत आहे. परिसरासह इतर तालुक्यांतील जुगारी या अड्ड्यावर मोठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे गावागावांत सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब जनता या जुगार अड्ड्याला बळी पडत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा जुगार अड्डा तात्काळ बंद करावा, अशी जनभावना आहे. स्थानिक पोलीस या जुगार अड्ड्याकडे डोळेझाक करीत आहेत.
बॉक्स
संचारबंदी काळात अड्ड्यावर गर्दी कशी?
तालुक्यात प्रत्येक रस्त्यावर, चौकाचौकांमध्ये पोलीस चौक्या आहेत. ये-जा करणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी तथा दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, साऱ्या जुगार अड्ड्यांवर शेकडो जुगारी जुगार खेळण्याकरिता पोहोचतात कसे, त्यांना जुगार अड्ड्यापर्यंत पोहोचण्याकरिता विशेष सवलत दिली जात आहे का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.