पुसद : येथील कापड लाइनजवळील दिल्लीवाला हॉटेलला शनिवारी मध्यरात्री १२ वाजता आग लागली. यात हॉटेलमधील फर्निचर जळून खाक झाले.
भट्टीजवळील धूर जाणाऱ्या चिमणीमधील अंगारामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हॉटेलमध्ये सहा ते सात गॅस सिलिंडर होते. सुदैवाने या आगीत सिलिंडरला आग लागली नसल्याने मोठा अनर्थ टळला. पालिकेचे अग्निशमन दल ताबडतोब घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले. सुपरवायझर शेकापूर व त्यांच्या टीमने आगीवर नियंत्रण मिळविले.
अधिकांश हॉटेलमध्ये अग्निबंब व्यवस्था नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आता शहरातील सर्व हॉटेलची पाहणी करून त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था आहे की नाही, याची चौकशी करू आणि जेथे व्यवस्था नसेल, त्यांना तत्काळ नोटीस देण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी दिली.