पुसद : तालुक्यातील दहिवड येथील आदेश संतोष भोरे याने ‘एएफसीएटी’ परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची इंडियन एअर फोर्समध्ये ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झाली आहे.
आदेशच्या निवडीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला अहे. तो प्रशिक्षणासाठी दुंडिगल (सिकंदराबाद) येथील एअर फोर्स अकॅडमीत येत्या ५ सप्टेंबर रोजी रुजू होत आहे. पायलटऐवजी प्रशासनातून स्पेशल कमांडो बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्याचे वडील संतोष भोरे शेतकरी असून आई कविता कृषी सहायक आहे. आदेशने दहावीपर्यंतचे शिक्षण येथील को.दौ. शाळेतून घेतले. नंतर नारायणन् स्कूल हैदराबाद येथून बारावी उत्तीर्ण केली.
बीई (मेकॅनिकल) ही अभियांत्रिकी पदवी पुणे येथील जेएसपीएम संस्थेतून पूर्ण केली.
एअरफोर्समधील साहसपूर्ण जीवन, वर्दीचे आकर्षण व समाजात मिळणारा सन्मान बघता त्याने अभियंताऐवजी ‘डिफेन्स’मधील पद निवडले. आदेशच्या यशाबद्दल फुलसिंग नाईक महाविद्यालयात एनसीसीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याने बारावीनंतर एनडीए व पदवीनंतर एएफसीएटी, आयएनइटी, सीडीएस संरक्षण व्यवस्थेतील परीक्षांबद्दल माहिती दिली.
त्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे, गोपाल जिरोणकर, रामदास जिरोणकर, दीपक जिरोणकर, चंदू कुबडे, पवन कदम, डॉ. प्रशांत बारापत्रे, रामभाऊ भालेकर, जय भालेकर, पंडित महाजन, सुरेश कुबडे आदींनी सत्कार केला.