लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पावसाच्या पाण्यात जलशुद्धीकरणाजवळील पाईपलाईन वाहून गेल्याने शहराला गुरूवारपासून तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. परिणामी ऐन पावसाळ्यात पुसदकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.२ जुलैच्या पावसात पूस नदीला पूर आला. त्याचा फटका जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाला बसला. या पुलावर कचरा अडकल्याने व नाल्याला वाहून आलेल्या लाकडी खोडामुळे पुसद शहराला होणाºया पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईनच वाहून गेली. ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात येताच मंगळवारी रात्री ११ वाजता पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. नगराध्यक्ष अनिताताई नाईक व मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनीही जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. या सर्वांनी वाहून गेलेल्या पाईपलाईनची पाहणी करून सदर काम गुणवत्तापूर्ण व लवकर कसे होईल, याविषयी संबंधितांना आदेश दिले.पाणी पुरवठा सभापती यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रावरून थेट जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे सांगितले. त्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले. कमीत कमी तीन दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहील, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीचा प्रकोप झाल्यास त्यात वाढ होऊ शकते. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे, असे आवाहनही दुधे यांनी केले.३० वर्षात प्रथमच घडली घटनागेल्या ३० वर्षांत मुख्य पाईपलाईन वाहून जाण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे तातडीने नगरपरिषद प्रशासन पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला लागले आहे. किमान तीन दिवसांत सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा पालिकेचे पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी व्यक्त केली.
पुसदचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:13 PM
पावसाच्या पाण्यात जलशुद्धीकरणाजवळील पाईपलाईन वाहून गेल्याने शहराला गुरूवारपासून तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. परिणामी ऐन पावसाळ्यात पुसदकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
ठळक मुद्देपाईपलाईन वाहून गेली : पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई