पथक गठित : अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणलेपुसद : शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी केली जाणार असून पुसद शहरात खासगी रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. यासाठी तपासणी पथक गठित करण्यात आले असून चुकीचे काम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या मोहिमेने अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.उच्च न्यायालयाच्या दाखल एका जनहित याचिकेनुसार महाराष्ट्र शासनाने १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात महसूल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी रुग्णालयांची तपासणी करणार आहे. पुसद शहरातही पथक गठित करण्यात आले असून या पथकाने शहरातील काही रुग्णालयांची तपासणीही केली आहे. खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया गृह, बाळंतपण कक्ष, क्ष-किरण आदी तपासणी केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांच्या पदवीस अनुसरून औषधोपचार केला जातो काय, याची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्येक तपासणीचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला जाणार आहे. पुसद शहरात काही बोगस डॉक्टरांनी व्यवसाय सुरू केला आहे. वैद्यकीय पदवी नसताना अनेकजण व्यवसाय करताना दिसतात. गत आठवड्यात एका हॉटेलवर धाड मारून राजस्थानच्या बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. पुसद शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा नसताना रुग्णांची पिळवणूक केली जाते. हा प्रकार थांबविण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. सरप्राईज व्हिजीट केली जाणार आहे. शहरातील सोनोग्राफी सेंटर आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली जाणार आहे. यामुळे रुग्णालयातील सेवांचा दर्जा सुधारून रुग्णांना चांगली सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसदमध्ये रुग्णालय तपासणी धडक मोहीम
By admin | Published: March 31, 2017 2:32 AM