यवतमाळ : पुसद वनविभागांतर्गत गेल्या दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली. परंतु यातील बहुतांश वन गुन्हे ‘बेवारस’ दाखविण्यात आले. त्यातील आरोपी कोण याचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही. अखेर पुसद विभागाच्या या ‘बेवारस’ कारभारावर खुद्द यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनीही शिक्कामोर्तब केले. गुरमे यांनी पुसद विभागातील तमाम सहायक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. गुरमे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसद विभागातील वन अधिकाऱ्यांची दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील वन विश्रामगृहावर ३ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीला पुसदचे डीएफओ सुरेश आलुरवार, सहायक वनसंरक्षक के.पी. धुमाळे, सुभाष धुमाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी खंडारे (पुसद), नाईकवाडे (महागाव), चव्हाण (उमरखेड), गिरी (दिग्रस), शिरसाट (मारवाडी), वाघोडे (काळीदौलत), शकील अहमद (शेंबाळपिंपरी) आदींची उपस्थिती होती. वनसंरक्षण, संवर्धन आणि प्रशासन या तीन मुद्यांवर ही बैठक गाजली. गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्याचे वन गुन्हे नोंदविले गेले. मात्र यातील बहुतांश गुन्हे ‘बेवारस’ दाखविण्यात आले. पुढे या गुन्ह्यांचा तपासही झाला नाही. पर्यायाने वृक्षतोड कुणी केली, आरोपी कोण, तस्कर कोण, यातील कुणाचाही थांगपत्ता लागला नाही. मिलिभगतमुळे बेवारस वन गुन्हे दाखविल्याने वृक्षतोड वाढतच राहिली. वनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात वन अधिकारी कमी पडल्याचा ठपका मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी ठेवला. गुरमे यांनी वृक्षतोडीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदार वन अधिकारी, कर्मचारी दोषी आढळल्यास कुणालाही सोडणार नाही, कारवाई होणारच अशा शब्दात अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. बेवारस म्हणून नोंद झालेल्या सर्व गुन्ह्यांच्या फाईली उघडून आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश गुरमे यांनी दिले. यातील अनेक वन अधिकारी तालुका मुख्यालयी राहून जंगल संरक्षण करीत असल्याचा प्रकारही निदर्शनास आला. अधिकारी जंगलात जात नसल्याने कर्मचारीही फिरकत नाहीत. पर्यायाने सागवान तस्करांना मोकळे रान मिळते. मराठवाड्याची सीमा लागून असल्याचा फायदा तस्कर उचलतात. या बैठकीनंतर वन प्रशासन सक्रिय होण्याऐवजी डीएफओ आलुरवार रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. या बैठकीमध्ये दिवाळीदरम्यान शेंबाळपिंपरी भागात झालेल्या बिबट शिकार प्रकरणावरही गुरमे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (जिल्हा प्रतिनिधी)
पुसद वन विभागाचा ‘बेवारस’ कारभार उघड
By admin | Published: November 06, 2014 2:19 AM