लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेमंडच्या यवतमाळ येथील प्रकल्पाला आज २५ वर्षे होत आहेत. हा दिवस रेमंड परिवाराबरोबरच यवतमाळकरांसाठीही कौतुकाचा, आनंदाचा सोहळा असल्याचे सांगत गुणवत्ता, विश्वासार्हता आणि आपुलकी हेच या उद्योगाच्या यशाचे गमक असल्याचे रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सांगितले.रेमंड इको डेनिम प्रा.लि. लोहारा येथे संस्थेच्या रजत जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, आमदार मदन येरावार यांची मंचावर उपस्थिती होती. तत्कालीन उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री जवाहरलाल दर्डा यांच्याकडे २७ वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो. रेमंड प्रकल्पासाठी जागा विचारली असता यवतमाळ आपलेच घर आहे. तुम्ही सांगाल तिथे प्रकल्पासाठी जागा देऊ, असा शब्द देत त्यांनी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यावेळी १०० कर्मचाऱ्यांवर सुरू झालेल्या या प्रकल्पात आज तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून येथील उत्पादनाला जगाच्या कानाकोपऱ्यात मागणी आहे. त्यातही यवतमाळ प्रकल्पातील उत्पादन सर्वाधिक प्रसिद्ध आहे. रेमंडच्या २५ वर्षांच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. रेमंड केवळ कपडा उद्योगापुरताच मर्यादित राहिलेला नसून आज गृहोद्योगातही दमदार पाऊल ठेवले आहे. ठाण्यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. याबरोबरच अन्न प्रक्रिया उद्योगातही आपला सहभाग असून शैक्षणिक उपक्रमासाठीही आपण पुढाकार घेतला आहे. सध्या साडेअकरा हजार विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देत असून पुढील दोन वर्षांत ही संख्या २१ हजारांवर जाणार आहे. आयुष्यात किमान एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा संकल्प केला असल्याचेही गौतम सिंघानिया यांनी सांगितले.आमदार मदन येरावार यांनी रेमंडच्या २५ वर्षांनिमित्त शुभेच्छा देत येणाऱ्या काळातही रेमंड कापड उद्योगासह इतर क्षेत्रातही अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त केला. उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आमदार म्हणून सदैव प्रयत्नरत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.कार्यक्रमाला माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, डॉ. ललित निमोदिया, ॲड. संजय लुक्का, एमआयडीसीचे आनंद भुसारी, जगजितसिंग ओबेराय, विलास देशपांडे, जाफर खान यांच्यासह गावातील निमंत्रित तसेच रेमंडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथूर, तर आभार यवतमाळ रेमंडचे मुख्य संचालक नितीन श्रीवास्तव यांनी मानले.
रेमंड उद्योगाचे कार्य काैतुकास्पद - विजय दर्डालाेकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी रजत जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त रेमंडच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विविध ठिकाणचे पर्याय उपलब्ध असताना रेमंडने यवतमाळवर विश्वास दाखवून येथे प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून आज दर्जेदार उत्पादन होत आहे याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. केवळ कापड उद्योगच नव्हे तर शिक्षण, गृहउद्योग आदीतही रेमंडने गरुडझेप घेतल्याचे सांगत, रेमंडचा नारा कम्प्लिट मॅन असा आहे. त्यांनी यवतमाळलाही आता परिपूर्ण बनवावे, असे दर्डा यांनी सांगितले. हा प्रकल्प येताना येथे नाईट लँडिंग सुविधेसह सुसज्ज विमानतळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, आज या विमानतळाची अवस्था दयनीय असल्याचे सांगत विजय दर्डा यांनी खंत व्यक्त केली. रेमंडला दिलेला शब्द शासनाने पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.