रूपेश उत्तरवार
यवतमाळ : गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या खरीप हंगामात राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा उतरविण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली असून, त्याचा अर्ज करण्याची सोमवारी अंतिम मुंदत आहे. मात्र, सीएससी, सेतू आणि इतर केंद्रांवरील सध्याच्या विविध योजनांसाठीची गर्दी पाहता उरलेल्या ८४ लाख शेतकरी भाऊंना अखेर पीकविमा मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गतवर्षी एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यावर्षी ही संख्या ८४ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. याचा अर्थ गतवर्षीच्या तुलनेत अजून ८४ लाख शेतकऱ्यांचे अर्ज येणे बाकी आहेत. मात्र, विविध केंद्रांवर लाडकी बहीण योजनेसाठी गर्दी झाली आहे. शेतकऱ्यांचा अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली असून, पिकविम्याच्या अर्जाला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
सीएससी केंद्रावर एक दिवस आधीच कागदपत्रे
पीकविमा काढताना कुठलाही गोंधळ नको म्हणून सीएससी केंद्राकडून एक दिवस आधीच कागदपत्रे गोळा केले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे.