यवतमाळ : शिक्षणापासून दूर असलेल्या वंचितांच्या लेकरांचे जीवन म्हणजे एक प्रश्नचिन्ह. कसे जगावे, हा प्रश्न त्यांना आयुष्यभर सुटत नाही. पण त्यांच्या प्रश्नांकित जीवनाला आकार देण्यासाठी जन्माला आली ‘प्रश्नचिन्ह’ नावाचीच आश्रमशाळा. वंचितांच्या या ‘प्रश्नचिन्हात’ शिरून यंदा शिक्षक महासंघाने उत्तरांचे फटाके फोडले. स्मितहास्याच्या पणत्या लावल्या. आता दरवर्षी गणवेशाच्या रुपाने येथील विद्यार्थ्यांना एक हमखास उत्तर मिळणार आहे.मंगरूळ चव्हाळा येथे ही शाळा आहे. फासेपारधी समाजातील समस्याग्रस्त मुलांसाठी भरणाºया या शाळेचे नावच आहे प्रश्नचिन्ह आश्रमशाळा. वंचितांच्या मुलांसाठी देवदूत ठरलेल्या मतीन भोसले यांनी सरकारी नोकरी सोडून ही शाळा सुरू केली. शिक्षणाचा गंध नसलेल्या शेकडो मुलांना येथे शिक्षण दिले जाते. परंतु, साध्या कपड्यांपासून तर राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत त्यांचे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. म्हणूनच शिक्षक महासंघाच्या पुढाकाराने यंदाची दिवाळी प्रश्नचिन्ह शाळेतच साजरी करण्यात आली. दिवाळीच्या दिवशी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह सर्व पदाधिकारी सहपरिवार या शाळेत पोहोचले. तेथील मुलांना दिवाळीचा फराळ देण्यासोबतच त्यांच्यासोबत फटाके फोडण्यात आले. आता दरवर्षी येथील ५०० मुलांना गणवेश वितरित करण्याचा संकल्प शेखर भोयर यांनी केला. शिक्षकांकडूनच मिळालेली ही दिवाळी भेट ‘प्रश्नचिन्ह’च्या मुलांसाठी आशादायक उत्तर ठरले. यावेळी निवासी शाळेचे मतीन भोसले उपस्थित होते.
‘प्रश्नचिन्हा’त फुटले उत्तरांचे फटाके, वंचितांची दिवाळी, शिक्षकांनी दिले आनंदाचे क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 4:43 AM