चुकारे नाही : शेतकऱ्यांचा विश्वास उडाला यवतमाळ : शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा असताना सरकार केवळ त्या सोडविण्याचा देखावा निर्माण करीत आहे. आता तूर खरेदीची मुदत सात दिवसांनी वाढविण्याचे तोंडी आदेश आहे. मात्र आधीची आश्वासने हवेत विरल्याने शेतकऱ्यांचा या मुदतवाढीवरही विश्वास उडाला आहे. शेतकऱ्यांना आधारभूत दर मिळावे म्हणून तूर खरेदीसाठी हमी केंद्र सुरू करण्यात आले. हे केंद्र केवळ बुजगावणे ठरले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालाच नाही. त्यांनी आपली तूर केंद्रावर नेली. मात्र त्यांच्यापेक्षा व्यापाऱ्यांचीच तूर मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. काही केंद्रांवर असा शेतमाल जप्तही झाला. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. या-ना त्या कारणाने हे केंद्र सतत बंद होते. शेवटच्या क्षणाला केंद्र खुले झाले. तेव्हा केंद्राची मुदत संपली. ते बंद करण्याच्या सूचना धडकल्या. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले. प्रत्यक्षात मधेच खरेदी बंद झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सरकारच्या शब्दावरील विश्वासच उडाला आहे. त्यातच महिनाभरापासून चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. (शहर वार्ताहर) बारदाना पोहोचलाच नाहीमार्च महिन्यात बारदाना घेऊन निघालेले चार ट्रक अद्याप पोहचले नाही. तत्काळ चुकारे देण्याची घोषणाही हवेत विरली. नाफेडचे केंद्र वाढण्याची ग्वाहीसुद्धा खोटी ठरली. उलट काही केंद्र बंद पडले. आता सात दिवसांची मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र लेखी पत्र नाही. उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी शेतकरी संकटात सापडले आहे.
नाफेडच्या तूर खरेदी मुदतवाढीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: April 17, 2017 12:29 AM