फोटोदिग्रस : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथे घरपोच सेवेला हरताळ फासून चक्क दारू दुकानातूनच दारू विक्री सुरू आहे. दारूसाठी तळीरामांनी दारू दुकानासमोर रांगा लावल्या आहे.
शहरात अनेक ठिकाणी सर्रास कोविड नियमाचे उल्लंघन होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मद्य विक्री करणाऱ्या परवानाधारकास कोविड नियमांचे पालन करून घरपोच मद्य विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. २८ एप्रिल रोजी या मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरतास तळीरामांनी मद्य दुकानासमोर एकच गर्दी केली होती.
रविवारीसुध्दा सकाळपासूनच मद्य दुकानासमोर ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. मद्य विक्री दुकानांसमोर वारंवार तळीरामांची होणारी गर्दी शहरात कोरोना स्प्रेडर स्पॉट ठरू पाहात आहे. स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बॉक्स
ग्रामीण भागात अवैध दारू विक्री
शहरातील मानोरा रोडजवळील पेट्रोल पंपाजवळ भररस्त्यात अवैध दारूची विक्री होत असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात अवैध दारू जोरात विक्री सुरू आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे.