गौण खनिज चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पांढरकवडा : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. ही चोरी सुरू असताना महसूल आणि वन प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. दिवसरात्र कोणतीही रॉयल्टी न घेता तस्करांकडून गौण खनिजाचा उपसा केला जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे ही गौण खनिज चोरी रोखण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
अशासकीय समित्यांचे काम थंड बस्त्यात
पांढरकवडा : सामान्य जनतेच्या हितार्थ शासनस्तरावरून लोकोपयोगी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग असावा, यासाठी गावागावात अशासकीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी या समित्यांचे काम थंड बस्त्यात असल्याने या समित्यांना कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गुटखा विक्री अद्यापही जोरात सुरूच
पांढरकवडा : शासनाकडून गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक मोठी गावे गुटखा विक्रीची केंद्रे बनली असून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासन कारवाई करीत असले तरी राजरोस गुटखा विक्री केली जात आहे. त्यामुळे ही गुटखा विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.