लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : यावर्षी धो-धो कोसळणारा पाऊस कमी होताच तालुक्यातील रेती घाटावरील रेतीची तस्करी करण्याचे नियोजन रेती तस्करांनी आखले आहे. दोन आठवडे पाऊस गायब होताच, रेती तस्करीला सुरुवात झाली असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या रेती तस्करांकडून रेतीचा वारेमाप उपसा केला जात आहे. तालुक्यात वर्धा नदीवरील कोसारा, दांडगाव गाडेगाव आदी ठिकाणी रेती घाट आहे, तर निर्गुडा नदी आणि इतर मोठ्या नाल्यांवरसुद्धा रेतीचे मुबलक साठे आहेत. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने या रेतीघाटाचे लिलाव करून हे रेती घाट तीन वर्षांच्या कालावधीनंतर खुले केले होते. यावर्षीसुद्धा तालुक्यातील सर्वच रेती घाट लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे. रेतीला मिळणारे दर पाहता तस्कराची संख्या वाढली आहे. स्थानिक पुढारी राजकीय आश्रय मिळवत रेती तस्करीच्या व्यवसायात येत असल्याचे काही घटनांवरून उघड होत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची व्यस्तता पाहता, या रेती चोरीला उधाण येण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कर्मचारी सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणार असल्याने नेमका याचा फायदा उचलत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शासनाने रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी - रेतीचा चढा दर आणि तस्करीतून होणारी कमाई पाहता, या व्यवसायात अनेकजण येत आहेत. जिल्हा प्रशासन या रेती घाटाचे लवकर लिलाव करत नसल्याने रेती तस्करीला चांगलाच वाव मिळत आहे. तालुका प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून जरी या रेती घाटाचे रक्षण केले तरी रेती चोरीच्या घटना घडणारच आहेत. त्यात राजकीय दबाव प्रशासनावर येत असतो. त्यामुळे रेती तस्करी रोखताना तालुका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचा परिणाम रेती लिलावाच्या रकमेवर होतो. त्यापेक्षा जिल्हा प्रशासनाने या रेती घाटाचे लवकर लिलाव करावे, अशी मागणी रेती घाट खरेदीदारांकडून होत आहे.