लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुमार गंधर्वांचा आशीर्वाद लाभलेले ख्यातकीर्त शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मैफल शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर आयोजित करण्यात आली आहे.बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त मागील वर्षी यवतमाळच्या रसिकांना ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्यांतून लोकप्रिय झालेल्या महेश काळे यांचे गायन अनुभवता आले. यंदा याच चित्रपटासाठी स्वर देणारे दुसरे महत्त्वाचे गायक राहुल देशपांडे यांची स्वरांजली होत आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या खाँ साहेब आफताब हुसेन बरेलीवाले या मध्यवर्ती पात्रासाठी राहुल देशपांडे यांनी पार्श्वगायन केले. विशेष म्हणजे, चित्रपटापूर्वी ‘कट्यार काळजात घुसली’ हे कथानक नाट्यरूपात रंगमंचावर सादर झाले. त्यावेळी खाँ साहेबांची भूमिका स्वत: राहुल देशपांडे यांनीच दमदारपणे साकार केली होती. आता तेच स्वर साक्षात यवतमाळकरांना ऐकता येणार आहे.राहुल देशपांडे दरवर्षी आपले आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘वसंतोत्सव’ आयोजित करून रसिकांना अस्सल गायकीची मेजवाणी देतात. ‘संगीत मानापमान’ या प्रसिद्ध संगीत नाटकाची राहुल देशपांडे यांनी नव्या स्वरूपातील आवृत्ती साकारली असून पूर्वीच्या ५२ ऐवजी २२ शास्त्रीय गीतांचा समावेश केला आहे. शिवाय ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातूनही त्यांनी शास्त्रीय गायनाचा नजराणा रसिकांना दिला आहे. शिवाय ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा चित्रपटांसाठी त्यांचे पार्श्वगायन लोकप्रिय झाले. तर आगामी ‘अ मंथ अॅन्ड अ विक’ या चित्रपटासाठीही पार्श्वगायक आणि अभिनेता म्हणूनही राहुल देशपांडे यांनी काम केले आहे.शास्त्रीय गायनासोबत नाट्यगीत, ख्याल, दादरा, ठुमरी, भजन, गझल आणि भावगीताच्या प्रांतातही राहुल देशपांडे यांनी रसिकांची दाद मिळविली आहे. अशा या बहुआयामी गायकाची मैफल ऐकण्याची संधी यवतमाळकरांना उपलब्ध झाली आहे.बहुआयामी शैलीचे शास्त्रीय गायकसुप्रसिद्ध शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेल्या राहुल देशपांडे यांचा जन्म १० आॅक्टोबर १९७९ मध्ये पुण्यात झाला. बालपणापासूनच कुमार गंधर्वांचे गायन ऐकून राहुल यांच्यावर शास्त्रीय गायनाचे संस्कार रुजले. सुरुवातीला उषाताई चिपलकट्टी आणि कुमार गंधर्व यांचे सुपुत्र मुकुल शिवपुत्र यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे गिरविले. पुढे गंगाधरबुवा पिंपळखरे आणि मधूसुधन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात संगीताचे प्रशिक्षण घेतले. शिवाय सुरेश सामंत यांच्याकडून राहुल देशपांडे यांनी तबला वादनातही वर्चस्व मिळविले. शास्त्रीय गायक अशी ओळख राहुल देशपांडे यांनी कमावलेली असली तरी भजन, नाट्यगीत, गझल, भावगीत या प्रांतातही त्यांचा हातखंडा आहे. ‘झी मराठी’वरील ‘सारेगामापा-लिटील चॅम्प’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये राहुल देशपांडे हे जज म्हणून काम पाहतात. ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातील पार्श्वगायनामुळे ते घराघरात पोहोचले आहे. अत्यंत तरुण वयात संगीतक्षेत्रातील महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. सवाई गंधर्व संगीत सोहळ्यात त्यांना ‘रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे अवॉर्ड’ मिळाला. २०१२ मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार त्यांनी पटकावला. तरुण वयातच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘सुधीर फडके पुरस्काराने’ त्यांचा गौरव करण्यात आला. तर २०१६ मध्ये ‘झी चित्रगौरव’तर्फे उत्कृष्ट गायनासाठी त्यांना स्पेशल ज्युरी अवॉर्ड देण्यात आला.संगीतमय प्रार्थना सभाजवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती समारोहानिमित्त रविवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रेरणास्थळावर संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रथितयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील.‘भारत कधी कधी माझा देश आहे’ वर व्याख्यानजवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त रविवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दर्डा मातोश्री सभागृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, पटकथा लेखक, चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांचे व्याख्यान होत आहे. ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ‘सामना’सारख्या गाजलेल्या मराठी सिनेमासाठी रामदास फुटाणे यांनी पटकथालेखन, दिग्दर्शन केले आहे. हास्यकवी म्हणून प्रसिद्ध असलेले रामदास फुटाणे आपल्या व्याख्यानातून खुसखुशीत शैलीत सामाजिक व्यंगांवर भाष्य करणार आहेत. त्यांच्या व्याख्यानासोबतच यावेळी भारत दौंडकर आणि अनिल दीक्षित हे दोन दिग्गज कवीही ठेवणीतल्या काव्यरचना सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील तीन-तीन नामवंत कवींना एकत्र ऐकण्याची संधी यावेळी रसिकांना चालून आली आहे.इनामी काटा कुस्त्यांची दंगलयवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता इनामी काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून या दंगलीत दहा लाखांच्या बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे.
कुमार गंधर्वांचा आशीर्वाद लाभलेले राहुल देशपांडे यांची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:24 PM
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा स्मृती समारोह : शास्त्रीय संगीतासह साहित्यिक व्याख्यानाची मेजवानी