यवतमाळ : शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये लॉजिंगच्या नावाखाली शरीरसंबंधासाठी रूम दिले जातात. महाविद्यालयीन प्रेमीयुगुल दोन ते तीन हजार रुपये मोजून या हॉटेलवर एकांत शोधतात. यातूनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. अवधूतवाडी पोलिसांनी सोमवारी दुपारी ट्रॅव्हल्स पॉइंटवरील हॉटेल गॅनसन्सवर धाड टाकली. येथे त्यांना व्यवसाय करणारी वारंगना, महिला व मुली पुरविणारा दलाल हाती लागला. इतर रूमची झडती घेतली असता तीन प्रेमीयुगुलही आढळून आले.
हॉटेल गॅनसन्समध्ये अनेक दिवसांपासून अवैध कुंटणखानाच चालविला जात आहे. मात्र पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळत नव्हती. या हॉटेलमध्ये राळेगाव तालुक्यातील तरुणाने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही घटना १५ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणात ५ एप्रिल रोजी अवधूतवाडी पोलिसांनी अर्पित संतोष दांडेकर (२८, रा. अंतरगाव) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हॉटेल गॅनसन्स पोलिसांच्या रडारवर होते. सोमवारी दुपारी गाेपनीय खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली. त्यानंतर लगेच ठाणेदार मनोज केदारे यांनी वरिष्ठांची परवानगी घेत पंचांना सोबत घेऊन या हॉटेलमध्ये धाड टाकली.
या कारवाईत व्यवसाय करणारी वारंगना ग्राहकासोबत रंगेहाथ सापडली. इतकेच नव्हे तर याच हॉटेलमध्ये राहून महिला, मुली पुरविणारा दलालही पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या मोबाइलमध्ये अनेक महिला, मुलींचे फोटो आढळून आले. काही प्रतिष्ठीतही त्याच्या संपर्कात असल्याचे मोबाइल तपासणीत पुढे आले आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर हॉटेलमधील इतरही रूमची झडती घेण्यात आली. त्या रूममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी नको त्या अवस्थेत सापडल्या. यात तीन विद्यार्थी व तीन मुली यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना बोलावून सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. मात्र हॉटेलमधील वारंगना, दलाल, ग्राहक याच्यासह त्या हॉटेल मालकाविरोधातही पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरातील काही लॉज कुप्रसिद्ध
शहरातील मध्यवस्ती असलेल्या काही लॉजमध्ये केवळ शरीरसंबंधासाठी तासाने रूम उपलब्ध करून दिले जातात. याची कुठलीही नोंद ठेवली जात नाही. रजिस्टरवर खोट्या नोंदी घेऊन ते मेन्टन केले जाते. यातूनही गंभीर प्रकार घडत आहेत. याशिवाय काही वस्त्यांमध्ये थेट घरातही कुंटणखाने चालविले जात आहेत. अवधूतवाडी पोलिसांकडून सातत्याने याविरोधात कारवाई सुरू आहे. मात्र, शहरातील इतर भागात अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही.