आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा प्रकोप कायम असल्याने शेतकरी हादरले आहे. यवतमाळ शहरातील गोधणी मार्गावर गारांची चादर पडली होती. सर्वाधिक नुकसान महागाव तालुक्यातील मुडाणा, बिजोरा परिसरात झाले असून जोरदार पावसाने नाल्याला पूर आला होता.रविवारी यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. सोमवारी सकाळी स्वच्छ उन्ह निघाले होते. मात्र दुपारच्यानंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन सायंकाळी वादळी वाºयाला प्रारंभ झाला. यवतमाळ शहरात ५ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. कळंब चौक, गांधी चौक, एलआयसी चौक, बसस्थानक, गोधनी रोड परिसर यासह शहराच्या पूर्व भागात गारांचा वर्षाव झाला. तर सुमारे अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली.वादळी पावसाचा सोमवारी सर्वाधिक तडाखा महागाव तालुक्याला बसला. बिजोरा, राजुरा, घानमुख, कोठारी, बेलदरी परिसरात ५ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराची गारपीट झाली. या गारांचा शेतात थर साचला होता.यामुळे गहू, हरभरा यासह कोबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील गहू तर भूईसपाट झाला होता. फुलसावंगी परिसरालाही वादळाने चांगलाच तडाखा दिला. वडद, मुडाणा येथे ५.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तसेच जोरदार गारपीट झाली. शेतातील उभे पीक नष्ट झाले. महागाव तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने १७ हजार हेक्टरवरील हरभरा पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी केली आहे. परंतु या पावसाने हा हरभरा मातीमोल झाला.पांढरकवडा तालुक्यातील रुंझा परिसरालाही पावसाने झोडपून काढले. पाथरी गावाजवळ मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. कळंब येथे सायंकाळी ७ वाजतापासून गारांसह जोरदार पाऊस झाला. नेर तालुक्यालाही वादळी पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील सोनखास परिसरात आवळ्याच्या आकाराची गार कोसळली. तर मालखेड परिसरात वादळामुळे मोठ्ठाले वृक्ष उन्मळून पडले. घुई येथे झालेल्या प्रचंड वादळाने अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली तर विजेचे खांबही उन्मळून पडले. राळेगाव तालुक्यालाही गारांनी तडाखा दिला. तर वडकी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उमरखेड तालुक्यातील लोरा, कारखेड, देवसरी या भागात काही प्रमाणात गार आणि पाऊस झाला. तर पोफाळी, पळशी, कुपटी या ठिकाणी वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दारव्हा तालुक्यातील फुबगाव परिसरात सायंकाळी गारपीट झाली. तर घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. मारेगाव तालुक्यात सायंकाळी प्रचंड गारपीट झाली. खैरगाव बुटी, टाकळी, केगाव, बोदाड, गाडेगाव, चिंचमंडळ, बोरी बु., मजरा, कोथुरला, महादापेठ, दापोरा, रामेश्वर, कुंभा, शिवणी येथे जोरदार गारपीट झाली.यवतमाळात अचानक आलेल्या पावसाने मजुरांचे हाल केले. रस्त्याच्या कामाकरिता आलेल्या मजुरांच्या झोपड्या वाºयाने उडून गेल्या. यामुळे मजुरांना ऐनवेळी दुसरीकडे आसरा शोधत धाव घ्यावी लागली. शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनाही या वादळी पावसाचा फटका बसला. महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सभामंडपालाही याचा फटका बसला. यवतमाळच्या रोटरी महोत्सवातही गारांसह झालेल्या पावसाने धावपळ उडाली.४३ मिमी पावसाची नोंदयवतमाळ जिल्ह्यात गत दोन दिवसात ४३ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने घेतली. यवतमाळ शहरात एक मिमी, पुसद एक मिमी, नेर १८ मिमी, वणी २ मिमी, पांढरकवडा १६ मिमी तर मारेगावमध्ये पाच मिमी पाऊस झाला.प्रशासनाचा सतर्कतेचा इशारापुढील २४ तासात दक्षीण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकºयांनी कापलेले पीक सुरक्षित स्थळी ठेवावे, शेत आणि धान्याची काळजी घ्यावी, वीज चमकताच झाडाचा आसरा टाळावा, गरज भासल्यास ०७२३२-२४०७२० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.बाभूळगावच्या गारपिटीत शेकडो पक्षी मृत्यूमुखीबाभूळगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीत शेकडो पक्षांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. पोपट, चिमण्या, मैना आदी प्राणी गारांच्या वर्षावात मृत्युमुखी पडले. तालुक्यातील करळगाव, कृष्णापूर, पाचखेड, सौजना, सिंधी, घारफळ, परसोडी परिसरात पावसासह गार कोसळली.
यवतमाळसह जिल्ह्यात पाऊस व गारांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:43 AM
शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा प्रकोप कायम असल्याने शेतकरी हादरले आहे.
ठळक मुद्देपिकांचे नुकसान : दुसऱ्या दिवशी आसमानी संकट कायम