यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात बरसणारा पाऊस लहरी स्वरूपाचा आहे. कधी जोरदार बरसेल तर अनेक दिवस पाऊस गायब होतो. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. यातून शेतीचे उत्पन्न घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. यामध्ये साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तर पावणेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. कपाशीचे पीक पात्या आणि बोंडाच्या अवस्थेत आहे. याच वेळी पावसाने दडी मारल्याने पातेगळ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे एकरी उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोयाबीन फुल आणि कळ्यांच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी शेंगांचे चरपट धरलेले आहेत. मात्र पाऊस नसल्याने ही पिके पिवळी पडत आहेत. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. कोमेजलेल्या अवस्थेतील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न बरसल्यास शेतशिवाराला मोठा धोका निर्माण होणार आहे.
अचानक गायब झालेल्या पावसाने शेतजमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. उन्हाच्या तीव्रतेने जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला आहे. यामुळे शेतातील पिके सुकत आहेत. वेळेपूर्वी पाऊस न बरसल्यास शेंगाचे टरफले शिल्लक राहतील. त्यामध्ये दाणे भरणार नाहीत किंवा ज्वारी इतके बारीक दाणे निर्माण होईल. यामुळे उत्पन्नात मोठा प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे.
कपाशीलाही पावसाची नितांत गरज आहे. मात्र, पाऊस न बरसल्याने कापसाच्या पिकांनीही माना टाकल्या आहेत. या ठिकाणी झाडाला लागणाऱ्या पात्या गळून पडत आहेत. वेळेपूर्वी पात्यांची गळ झाल्याने एकरी कापसाच्या उत्पादनाला याचा फटका बसणार आहे.
वीज वितरण कंपनीची मनमानी
वीज वितरण कंपनीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसाला वीजपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात दिवसाच्या वीज पुरवठ्यामध्ये झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली तासन्तास वीज गूल होत आहे. यामुळे ओलित करणेही अवघड झाले आहे. यातून सिंचनाची व्यवस्था असतानाही अनेक शेतकऱ्यांना ओलितही करता आले नाही. यामुळे कंपनीच्या धोरणावर शेतकऱ्यांकडून संताप नोंदविला जात आहे.
प्रकल्पातून पाणी मिळणार का ?
जिल्ह्यातील जलाशयामध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. परंतु यातून पाणी वितरण करणारी प्रणाली बिघडलेल्या अवस्थेत आहेत. पाटसऱ्या फुटल्याने पाणीपुढेच सरकत नाही. याशिवाय जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पाटसऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रकल्पातून पाणी मिळेल का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून पाटसऱ्यांची दुरुस्ती रखडल्याने प्रकल्प क्षेत्रातून पाणी असतानाही सिंचन होत नाही.