लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनाभराची विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याला संततधार पावसाने झोडपले. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. अरुणावती, पूस, वाघाडी, अडाण, पैनगंगा, खुनी अशा सर्वच महत्वाच्या नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक अडली. तर उमरखेड, पुसद रोडही बंद आहे.बुधवारी मध्यरात्रीपासून धुव्वाधार पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत अनेक तालुक्यांमध्ये पाऊस सुरूच होता. या पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत मोठी भर पडली. वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस बरसला आहे. गुरुवारी पूस, सायखेडा, बोरगाव असे एक मोठा तर दोन मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. त्याचवेळी वणी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. इतर प्रकल्पांमध्ये ५६.३१ टक्के जलसाठा झाला आहे. पाऊस कायम राहिल्यास लोअरपूस आणि नवरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.आर्णी तालुक्याला पावसाचा प्रचंड तडाखा बसला. शहरात सर्वत्र पावसाचे पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले, बहुतांश गोदाम जमिनीपासून तळात असल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. अरुणावती नदीला प्रचंड पूर आल्यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक दुपारनंतर ठप्प झाली. नदी-नाल्या काठावरील नागरिकांना नगरपरिषदेने सुरक्षित स्थळी हलविले. तालुक्यातील कोसदनी नाला दुथडी भरल्याने कोसदनी गावातही पाणी शिरले. तर माहूर रोडही बंद झाला. आर्णी तालुक्यात सावळी सदोबा गावात सर्वत्र पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरुन नुकसान झाले. कवठाबाजार येथे पैनगंगेच्या पुराने घरांना तडाखा दिला.दारव्हा शहरात पावसाने मोठे नुकसान केले. साचलेल्या पाण्यामुळे महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र धुके दाटले होते. दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव शिवारात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. तर दोन घरांच्या भिंती पडल्या.उमरखेड तालुक्यात दहागाव नाल्याला आलेल्या पुरामुळे उमरखेड-पुसद रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पूस धरण ओव्हर फ्लो झाले असून गुरुवारी आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरण भरल्याने पुसदवासीयांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.महागाव तालुक्यात पैनगंगा पुलावरून वाहू लागली. बाभूळगाव तालुक्यात धुव्वाधार पावसामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. पांढरकवडा येथील खुनी नदी, घाटंजीतील वाघाडी नदीही दुथडी भरली आहे. दीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर या महत्वाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र वांगे, पालक, सांभार, मेथी, टमाटर अशा भाजीपालावर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे.
संततधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:38 PM
महिनाभराची विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याला संततधार पावसाने झोडपले. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.
ठळक मुद्देवणीत अतिवृष्टी : आर्णी तालुक्याला जबर तडाखा, महामार्ग बंद, दारव्हा शहरात घुसला पूर