लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून बाभूळगाव, कळंब आणि केळापूर तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळापूरमध्ये ६५ मिमी, कळंबमध्ये ९३ मिमी तर बाभूळगाव तालुक्यात ११२.७ मिमी एवढा विक्रमी पाऊस कोसळला. इतर तालुक्यांतही पावसाचा जोर कायम होता. मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. येथे ४६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दारव्हा ४२.८, दिग्रस ६३.१, आर्णी ३९.२, नेर ५३.२, पुसद ६०.१, उमरखेड ५१.९, महागाव ४७, वणी ३९.४, मारेगाव ५८.५, झरी जामणी ५८.२, राळेगाव ४२.१ तर घाटंजी तालुक्यात २२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब भरलेयवतमाळ : मागील चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अरुणावती बेंबळासह प्रमुख प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अरुणावतीचे पाच गेट १० सेंटीमीटरचे उघडून ६० क्यूबिकने पाणी सोडण्यात आले आहे, तर बेंबळाचे १६ दरवाजे ५० सेेंटीमीटरने उघडून प्रकल्पातून ८४८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा जलाशयाची पाणी पातळी ३९८.७८ मीटर आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरला असून, १३७.२६ क्यूबिकने पाणी सोडण्यात येत आहे. अरुणावती प्रकल्पाची जलाशय पातळी ३३०.७५ मीटर आहे. या प्रकल्पात ९७.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बेंबळा प्रकल्पाची जलाशय पातळी २६७.९५ मीटर आहे. या प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर गोकी, वाघाडी, नवरगाव, बोरगाव आणि सायखेडा १०० टक्के भरले आहेत. याबरोबरच अधरपूस प्रकल्पात ९५.३७ टक्के, अडाण प्रकल्पात ९३.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- बेंबळासह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. आजवर पूस प्रकल्प परिसरात ६५१, अरुणावती ९१८, बेंबळा ५६५, गोकी ६३७, अधरपूस ५७८, बोरगाव ६५०, तर अडाण प्रकल्प परिसरात ८८५ मिमी पाऊस झाला आहे.