बाभूळगाव : राज्य शासनाने धोरणी निर्णय घेत पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण व्यवहार (लेव्ही) असलेले निर्बंध उठविले. त्यामुळे आता जमिनी विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. त्यातून लाखो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील जमिनीची विक्री करीत असताना शेतकऱ्यांना जमिनीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४० टक्के भूभाग लेव्ही म्हणून ठेवावा लागत होता. उर्वरित जमिनीची विक्री करता येत होती. शेतजमिनीचे गगनाला भिडलेले दर आणि गरजू शेतकऱ्यांची लेव्हीच्या नावावर अकारण अडवून ठेवलेली जमीन या प्रकारामुळे अनेकजण जेरीस आले होते. पैशाची नड असताना स्वत:च्या मालकीची ४० टक्के जमीन तो विकू शकत नव्हता. त्यामुळे लेव्ही हा कायदाच जुलमी असल्याचे शेतकऱ्यांना वाटायचे. याची दखल घेत शासनाने पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला. आता शेतकऱ्यांना जमिनीच्या सातबारा व हक्कातील नोंदीमध्ये पुनर्वसनाखाली राखीव जमीन म्हणून नोंदविण्यात आलेले शेरे रद्द करण्याची मान्यता दिल्या गेली आहे. तसे आदेशही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या शेऱ्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे लवकरच लेव्हीच्या नावावर राखीव ठेवलेल्या लाखो हेक्टर जमीन विक्रीचा मार्ग खुला होईल. (प्रतिनिधी)
पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लेव्ही उठविली
By admin | Published: February 26, 2015 2:07 AM