लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माझा दौरा हा पक्ष बांधणीसाठी आहे. त्यामुळे तुम्ही मला वेळ द्यावा ही अपेक्षा आहे. सभा व भाषणासाठी मी परत येणार आहे. रचनात्मक काम उभे करण्याकरता संघटनात्मक काम करणे आवश्यक आहे, एवढे बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळकरांची रजा घेतली. स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्रोतृगृहात जमलेल्या चाहत्यांना संबोधित केले.विदर्भ दौऱ्यात अमरावती येथील संघटनेची बांधणी चांगली झाली असून तेथे अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेथील संघटनेने रचनात्मक कामाला सुरूवात केली आहे. याचे परिणाम लवकरच दिसून येतील. असच काही चांगल यवतमाळात उभं करायची इच्छा आहे. यासाठी तुम्ही मला वेळ द्यावा. माझ भाषण ऐकण्यासाठी आपण दूरदूर आलात. पण माझा नाईलाज आहे. सभा, भाषण, टाळ््या यातून पदरात काहीच पडत नाही. केवळ माहोल तयार करता येतो. सभा व भाषणही निश्चित होईल. परंतु त्याकरिता माझ्या पदाधिकाऱ्यांना रचनात्मक कामासाठी कार्यक्रम देणे आवश्यक आहे. काही नियुक्त्या करायच्या आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कोणत्या कामाची अपेक्षा हेही जाणून घ्यायचे आहे. मी बोलणार नसल्याने तुमचा हिरमोड झाला असेल पण तो होऊ द्या. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा डिसेंबर-जानेवारीत विदर्भ दौऱ्यावर येणार असल्याचे राज ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितले. त्यानंतर यवतमाळ विधानसभा पदाधिकाऱ्यांनी दिलेला पुष्पगुच्छ स्वीकारून राज ठाकरे विश्रामगृहाकडे रवाना झाला. मात्र भाषणासाठी अडीच तास ताटकळत बसलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
पक्षबांधणीसाठी आलो- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:06 PM