पोलीस क्रीडा स्पर्धा : पोलीस मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद, विविध विभागातील १०३ स्पर्धकांचा समावेशनीलेश भगत यवतमाळपोलीस मुख्यालयाच्या राजकुमार कांबळे याने १०० मीटर, २०० मीटर धावणे, उंच उडी व तिहेरी उडीत अव्वल स्थान पटकाविले. मुख्यालयाच्याच रूक्सार शेख हिने १०० मीटर, २०० मीटर, ११० मीटर हर्डल्स, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक स्पर्धेत विजेतेपद पटकावून जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे बेस्ट अॅथलिट पुरूष व बेस्ट अॅथलिट महिलाचा पुरस्कार पटकाविला. मुख्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर २३ ते २५ आॅगस्टपर्यंत या स्पर्धा घेण्यात आल्या. यात वणी, पुसद, पांढरकवडा, दारव्हा विभाग व पोलीस मुख्यालयातील १३० खेळाडुंनी सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पांढरकवडाचे वन अधिकारी प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात आदिवासी ढेमसानृत्य, हिंदी हायस्कूलच्या खेळाडुंनी क्लिपिंग रोपचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. क्रीडा स्पर्धा गृह पोलीस उपअधीक्षक संजय पुज्जलवार, आरएसआय घोटेकर, प्रशिक्षक मोरेश्वर गोफणे तर सांस्कृतिक कार्यक्रम निरीक्षक संजय देशमुख, वाहतूक निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये राजकुमार कांबळे, रुक्सार शेख, अशोक राठोड, प्रतीक्षा केने, गौरीशंकर तेलंगे, मोनाली गारघाटे, सागर चिरडे, कृष्णा पवार, स्वाती सोळंके, उपविभागीय अधिकारी राहुल मदने, अर्चना सुपारे, रवींद्र भुताडे, चेतन उगले, किशोर भगत, सतीश मेश्राम, रवींद्र शेडमाके, नीलेश कदम, शुभांगी जांभुळकर, अश्विनी अवथळे, पुरूषोत्तम डडमल, सचिन फुंडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल पुरूष, कबड्डी पुरूष, खो-खो या सांघीक खेळात पोलीस मुख्यालयाने प्रथम स्थान प्राप्त केले. व्हॉलीबॉल व खो-खो महिला या खेळात वणी उपविभागाने तर व्हॉलिबॉल पुरूष संघाचे प्रथम बक्षीस पुसद उपविभागाने प्राप्त केले. कबड्डी महिलामध्ये पांढरकवडा उपविभाग, हॅन्डबॉल पुरूषमध्ये यवतमाळ उपविभाग अव्वल राहिला. पोलीस बँड पथकात बॅन्ड मेजर गणेश डोंगरे तर श्रमदानात कवायद निदेशकांनी प्रथमस्थान प्राप्त केले. पोलीस व जनता मैत्री सामन्यात फुटबॉलमध्ये पुसद विभाग, कबड्डी पुरूष पांढरकवडा, व्हॉलिबॉल पुरूष, दारव्हा विभाग (आर्णी)व्हॉलिबॉल पत्रकार संघ प्रथम राहिला. ५० मिटर धावणेमध्ये १२ वर्षे आतील मुलामध्ये प्रथम योगेश राजगडकर तर व्दितीय वेदांत जयस्वाल आला. संगीत खुर्चीमध्ये (महिला) प्रथम स्थान मनवर तर व्दितीय पल्लवी डोंगरे यांनी प्राप्त केले.
राजकुमार कांबळे, रुक्सार शेख सर्वोत्कृष्ट खेळाडू
By admin | Published: August 27, 2016 12:46 AM