यवतमाळ : सतत कोसळणाऱ्या पावसाने राळेगाव तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या ठिकाणी बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदी पात्रात आल्याने नाल्यांचे पाणी गाव शेजारीच थांबले आहे. यातून गावांमध्ये पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत राळेगाव तालुक्यातील १०० घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राळेगाव तालुक्यातील सावंगी गावामध्ये ३० घरांना पुराचा वेढा पडला आहे. एकबोर्जी गावातील ३५ घरे पुराच्या पाण्यात आली आहे. झाडगाव येथील ३० घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रावेरी येथील १५ घरे, चिकणा येथील १२ घरे व सावनेर मधील १० घरांना पुराचा वेढा बसला आहे.
अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने उघडण्यात आले आहे. पुढील काही तास पाणी असेच राहिले तर आणखी दोन दरवाजे पूस प्रकल्पाचे उघडले जाणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला
बाभूळगाव तालुक्यातील सरुळ गावामध्ये पाणी शिरले. या ठिकाणचे ११ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. यातील सात नागरिकांना ग्रामस्थांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढले. मात्र चार नागरिक मंदिरावरच चढून होते. आपत्ती व्यवस्थापन बोट आल्याशिवाय उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर तालुक्यातून बोट या गावात पोहोचली. चार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने पुरातून बाहेर काढले.
पुरात अडकलेल्या २० ग्रामस्थांना सुखरुप काढले बाहेरबेंबळा प्रकल्पासह अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदीपात्रात आल्याने राळेगाव तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील रावेरी येथे मुसळधार पावसामुळे रामगंगा नदीला पूर आला असून या पुराचे पाणी रावेरी गावातील तांडा वस्तीमध्ये शिरल्याने या पुरात २० नागरिकांसह अनेक जनावरे अडकून पडली होती. पूरपरिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह सरपंच पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. या सर्वांनी २० नागरिकांना दोराच्या मदतीने पुराबाहेर काढले असून या सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रावेरी ग्रामपंचायतीने दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे. दरम्यान या पुरामध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.