तूर खरेदी : जागेअभावी केंद्र अडचणीत, शेतकऱ्यांची गैरसोययवतमाळ : खुल्या बाजाराच्या तुलनेत नाफेडचे तूर खरेदीचे दर क्विंटलला ६५० रूपयांनी अधिक आहेत. यामुळे या खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. तुरीचे मोजमाप करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. पुढील काही दिवसात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जागेअभावी तुरीचे खरेदी केंद्र बंद होण्याचा धोका वाढला आहे.खुल्या बाजारात ३८०० ते ४४०० रूपये क्विंटल दराने तुरीची खरेदी होत आहे. तर नाफेडच्या खरेदी केंद्रावर ५०५० रूपयांचे दर आहेत. क्विंटलला ६०० ते १२०० रूपयांचा फरक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडकडे मोर्चा वळविला असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. माणसांची कमतरता, एकच चाळणी आणि एकापेक्षा अधिक वजनमाप काट्यांचा अभाव या समस्या जाणवत आहे. साधारणत: एका दिवशी २०० क्विंटल तुरीचा काटा एका केंद्राला करता येतो. प्रत्यक्षात दर दिवसाला ६०० ते ७०० क्विंटलची आवक होत आहे. यामुळे वजनमापाची प्रतीक्षा वाढली आहे. सध्या शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस मोजमाप करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहे. यंत्रणा वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.जागेअभावी आर्णी, राळेगाव आणि बाभूळगावची खरेदी झालेली तुरी यवतमाळकडे येत आहे. यामुळे यवतमाळच्या गोदामाची क्षमता संपत आली आहे. यातून नवीन गोदामाची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जागा न मिळाल्यास खरेदी केंद्र बंद पडण्याचाच धोका आहे. (शहर वार्ताहर)विदर्भ, मराठवाड्यात दोन लाख क्विंटल खरेदीनाफेडच्या खरेदी केंद्रांनी विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. जिल्ह्यात ही खरेदी आठ हजार क्विंटलच्या घरात पोहोचली आहे. शेतकऱ्यांची सर्वाधिक गर्दी या केंद्रांवर झाली आहे. यामुळे हा आकडा आणखी फुगण्याची शक्यता आहे.
नाफेडच्या केंद्रावर रांगा
By admin | Published: February 14, 2017 1:35 AM