राम पवार
सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम समाज वास्तव्य करीत आहे. त्यांची लोकसंस्कृती आदीम व पुरातन आहे. एकोपा आणि सांस्कृतिक सण उत्सवाचा इतिहास लाभलेल्या बंजारा समाजात जे विविध सण साजरे होतात, त्यात रंगोत्सवाचा होळी हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.
शिशिर ऋतू संपून झाडाची पानगळ थांबलेली असते. वनाग्नी किंवा 'फ्लेम ऑफ दी फॉरेस्ट' म्हणून ओळखला जाणारा पळस रानात केशरी रंगाची उधळण करतो. जस-जसा आंब्याला मोहर येऊन त्याच्या सुगंधाने कोकिळा मल्हार राग गाते, त्याचप्रमाणे वसंत ऋतूत लेंगी गीताला बहार येतो. माघ पौर्णिमेपासून तांड्यावरचा बंजारा बांधव शेतावरच्या जागलीवर, खळ्यावर किंवा तांड्यात लेंगीचा आस्वाद घेऊ लागतो. बैठी, पायी आणि टिपरी लेंगीच्या आनंदात बुडून गेलेल्या गोर बंजाराला होळीचा दिवस कधी जवळ येऊन ठेपतो, त्याचा थांगपत्ताही नसतो.
होळी उत्सवाची जबाबदारी तांड्यातील गेरियांच्या म्हणजे उपवर तरुणांच्या खांद्यावर असते. ते होळीच्या पूर्वसंध्येला मुलांनी शेणापासून तयार केलेल्या विविध आकाराच्या गवऱ्या व त्यांच्या माळा एकत्रित करतात. सर्वांना एकत्र करून होळी जाळण्याची तयारी करतात. मात्र, होळी सकाळी जाळतात. कारण असे की, एकेकाळी कधीतरी होळी जाळण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या बंजारा बांधवांनी विविध प्रकारच्या लेंगी गीतात आणि सल्लामसलत करण्यात अख्खी चांदणी रात्र व्यतीत केल्याची आणि रंगपंचमीच्या दिवशी सकाळी होळी जाळून आनंद साजरा केल्याची आख्यायिका आहे. पूर्वजांची ही प्रथा आजही जपून ठेवण्यात आली. तांड्यात होळी महोत्सव साजरा करण्यामागचा हेतू केवळ मौज-मजा करणे आणि वातावरण आनंदी ठेवणे एवढाच नसतो, तर थोर संतांच्या विचारांचा जागर करून प्रचार व प्रसार करणे, पर्यावरणाच्या संतुलनातून मानवी कल्याण कसे साध्य होईल, याविषयी जनजागृती करणे आणि बंजारा संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन करून ती पुढच्या पिढीला अवगत करणे, हा मुख्य हेतू असतो.
बॉक्स
पाळोदी येथे पारंपारिक वेशभूषेत होळी
आर्णी तालुक्यातील बंजाराबहुल सावळी सदोबा परिसरातील पाळोदी येथे होळी उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा करून बंजारा समाजबांधव त्यात सहभागी होतात. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजात होळी जाळण्याच्या ठिकाणी एरंडाच्या झाडाची पाने आणि कळशीभर पाणी आणून होळीची पूजा केली जाते. यात वरवर त्याची अंधश्रद्धा दिसत असली तरी तांड्याच्या सुरक्षिततेची दूरदृष्टी त्यात लपलेली असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तांड्यातील गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाच्या घरी जाण्याची, पारंपरिक लोकगीताच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्याचा मोबदला म्हणजे फगवा मागण्याची आणि आलेल्या पैशांतून सामूहिक वनभोजन करून होळी उत्सवाची सांगता करण्याची प्रथा आहे.