दारव्हा : होळीचा सण हा आपल्या प्रसन्नतेची, आपल्या आनंदाला विविध रंगांच्या माध्यमाने उधळण्याची, सर्वांशी मिळून व मिसळून वागण्याची, दुर्भावना मिटवण्याची, गोडधोड वा इतर पक्वान्नांचा स्वाद एकमेकांसोबत वाटण्याची प्रेरणा देतो. येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात ‘रंग माझा वेगळा’ या स्पर्धेने रंगपंचमी साजरी करण्यात आली.
कोरोनामुळे यावर्षी रंगपंचमी बेरंगीच राहील की काय, अशी धास्ती सगळ्यांच्या मनात होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊ नये, या अनुषंगाने भौतिकशास्त्र विभागाने आणि राष्ट्रीय सेवा योजनेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईनरीत्या ‘रंग माझा वेगळा’ ही रंगतदार स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किशोर हुरडे, उपप्राचार्य डॉ. सुनील चकवे उपस्थित होते. परीक्षक अमरावती येथील विन्सम ॲडर्व्हटायझिंग व फुलोर अकॅडमीचे संस्थापक पीयूष जोशी होते. आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत बागेश्वर, प्रा. बोरकर, प्रा. ताई कुमरे यांची मुख्य उपस्थिती होती. कार्यक्रमाकरिता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, सचिव डॉ. संगीता घुईखेडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
जागतिक महामारीच्या स्थितीत विद्यार्थ्यांची रंगपंचमी अगदी झक्कास साजरी व्हावी, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात रंगसंगतीबद्दलचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मनीष मोहरील, भौतिकशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक धनश्री कोठेकर यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
बॉक्स
मुलींनीच मारली बाजी
स्पर्धेत बी.एस्सी. भाग १ चा विद्यार्थी प्रतीक विवेक इंगोले याने आपल्या चेहऱ्यावर कोरोना व्हायरसची पेंटिंग काढून स्टे होम, स्टे सेफ, असा संदेश देत प्रथम क्रमांक पटकाविला. काजल राजू चव्हाण, अंबिका क्षीरसागर आणि भारती राठोड यांनी अनुक्रमे व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. प्राचार्य डॉ. राऊत यांनी सर्व विजेत्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. परीक्षकांचा परिचय रासेयो अधिकारी डॉ. मनीष मोहरील यांनी करून दिला. संचालन प्रा. धनश्री कोठेकर, तर आभार डॉ. भुरले यांनी मानले.