लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय उपखंडात दुर्मिळ म्हणून गणला जाणारा कॉमनरिंग प्लोवर हा पक्षी यवतमाळलगतच्या बोरगाव धरणावर आढळला. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास पक्षीनिरीक्षणादरम्यान त्याची नोंद घेतली.काराड्रीस हायटिकुला कॉमनरिंग प्लोवर असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव असून मराठीत त्याला मोठ्या कंठेरी चिखल्या असे म्हटले जाते. बोरगाव धरणावरील ही या पक्ष्याची नोंद यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच नोंद असून विदर्भातील दुसरी नोंद आहे. युरोप, आफ्रिका, वेस्ट व नॉर्थ आशिया, नॉर्थ अमेरिकेतून भारतीय उपखंडात येणारा हा दुर्मिळ पक्षी आहे. तो गुजरात, केरळ व पश्चिम बंगाल या समुद्रकिनाऱ्यावर शीतऋतू दरम्यान स्थलांतरित होतो. क्वचित वेळा मार्गस्थ असताना अंतदर्शिय पाणवठ्यावर येतो. त्यामुळे महाराष्ट्रात याची नोंद क्वचितच आहे.या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात या पक्ष्याची नोंद होणे ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यवतमाळच्या पक्षी गणनेमध्ये अशा पक्ष्याची नोंद दुर्मिळ आहे. त्यामुळे आम्ही फार आनंदी आहो, असे डॉ. प्रवीण जोशी म्हणाले. यावर्षीच्या नोंदीमध्ये पांढऱ्या पंखांचा काळा सुरयनंतरची ही दुसरी महत्त्वाची नोंद आहे. तसेच कानेल घुबड, युरोपीयन कोरल, बहिरी घुबड, निळ्या गालाचा पाणपोपट, बेलन्सची फटाकडी, काळा कस्तुरी या महत्त्वाच्या पक्ष्याच्या नोंदी यवतमाळात झाल्या. त्यामुळे यवतमाळची पक्षीसूची ३३८ पर्यंत पोहोचली आहे. निरंतर पक्षीनिरीक्षणामुळे यात भर पडेल, असेही मत या दोघांनी व्यक्त केले.
यवतमाळात आढळला दुर्मिळ कॉमनरिंग प्लोवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:42 AM
भारतीय उपखंडात दुर्मिळ म्हणून गणला जाणारा कॉमनरिंग प्लोवर हा पक्षी यवतमाळलगतच्या बोरगाव धरणावर आढळला.
ठळक मुद्देमोठ्या कंठेरी चिखल्या यवतमाळच्या पक्षीसूचीत आतापर्यंत ३३८ नोंदी