यवतमाळ : भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली.प्रामुख्याने सागर किनारे, भरती-ओहोटीच्या काळातील खाड्या, खाजणे आणि खाऱ्या पाण्याची तळी अशा ठिकाणांवर याचा वावर असतो. हा पक्षी उत्तर रशिया व सैबेरियातून भारतीय उपखंडात शीतऋतूदरम्यान स्थलांतर करतो. परतीच्या प्रवासादरम्यान यवतमाळजवळील जामवाडी तलावावर तो थांबला. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे यांनी त्याची नोंद घेतली. मुंबई, केरळ, गुजरातच्या समुद्री भागात हे पक्षी आॅक्टोबर ते एप्रिलदरम्यान आढळतात.
यवतमाळमध्ये आढळला दुर्मीळ ‘करडा तुतवार’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 5:38 AM