पुसद तालुका : एबी फॉर्मने दाखविली अनेकांना घरची वाट प्रकाश लामणे पुसद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नामांकनाच्या अखेरच्या दिवशी आणि अखेरच्या क्षणी सर्वच पक्षांनी एबी फॉर्म दिले. त्यामुळे अनेक इच्छुकांना पक्षाचे तिकीट मिळाले नाही. पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने सर्वच पक्षात रुसवे-फुगवे दिसत असून आता बंडोबा नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पुसद तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी ६९ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी तब्बल १०५ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. राष्ट्रवादी व भाजपा या दोन पक्षांनी सर्वच २४ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले. तर काँग्रेस व शिवसेनेला काही जागांसाठी उमेदवारच उपलब्ध झाले नाही. या सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांचे एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या हातात दिले. त्यामुळे अनेकांना निवडणुकीतून माघार घेत घराची वाट धरावी लागली. काही गट व गणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. एबी फॉर्म न मिळाल्याने माघार घेतलेले उमेदवार आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे काम कितपत मन लावून करतात यावर त्या उमेदवाराचे भविष्य अवलंबून आहे. तूर्तास नामांकन असले तरी ७ फेब्रुवारीला कोण कोण नामांकन मागे घेतो, यावर सर्व गणित अवलंबून आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी यंदा भाजपाने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सर्वच गटांमध्ये चौरंगी, पंचरंगी लढतीची चिन्हे आहेत. सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांना पक्षाचे नमुना अ व ब अर्ज ऐनवेळी दिले. त्यामुळे अनेकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले. पंचायत समितीच्या १६ गणात राष्ट्रवादी व भाजपाने आपले उमेदवार रिंगणात उतरविले असून शिवसेनेने ११ तर काँग्रेसने दहा उमेदवार रिंगणात उभे केले आहे. पांढुर्णा खु. व अडगाव या दोन ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचे नामांकन अपात्र करण्यात आले. तर अडगाव गटात राष्ट्रवादीने दोघांना एबी फॉर्म दिले होते. शेवटी एका नावावर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केले, तर दुसऱ्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली. बेलोरा गटातही शेवटपर्यंत ज्याचे नाव चर्चेत होते त्यांना बाजूला सारत दुसऱ्यालाच ऐनवेळी एबी फॉर्म देण्यात आला. तर पार्डी गणाचे विद्यमान सदस्य अवधूत मस्के यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी उमेदवारीच्या अपेक्षेनेच हा प्रवेश केला होता. परंतु भाजपाने ऐनवेळी दुसऱ्यालाच एबी फॉर्म दिला. त्यामुळे मस्के यांना रिंगणातून बाद व्हावे लागले. आता सर्वांना उत्सुकता आहे ती उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसाची. इतर पक्षांचीही जोरदार तयारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुसद तालुक्यातून भारिप बहुजन महासंघ, बसपा आणि स्वाभिमानी पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे. भारिप बहुजन महासंघाने शेलू बु., शिळोणा आणि इसापूर या तीन ठिकाणी तर बहुजन समाज पार्टी व स्वाभिमानी पक्षाने शेंबाळपिंपरी व श्रीरामपूरमधून उमेदवार रिंगणात उतरविले आहे. यासोबत अनेक अपक्षही रिंगणात दिसत आहे. आता ७ फेब्रुवारीला कोण उमेदवारी मागे घेतो, यावर सर्वांचे गणित अवलंबून आहे.
उमेदवारीवरून रुसवे-फुगवे
By admin | Published: February 04, 2017 1:14 AM