लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याचे समोर आले आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या नागरिकांना कामाचे खाडे पाडून रेशन दुकानासमोर घालवावे लागत असल्याने मारेगाव तालुक्यातील नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत. प्रसंगी नागरिक धान्य दुकानदार यांच्यावर ताशेरे ओढून शिवीगाळ करू लागले आहेत. यामुळे धान्य दुकानदारांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.
ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने वैतागलेल्या तालुक्यातील रेशन दुकानदारांनी जुलै महिन्याचे अजूनही धान्य वाटप व्हायचे असून, जुलै महिन्यातील धान्याला मुदत वाढवून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. नागरिक भांडणे करून मारण्याची धमकी देत असल्याने संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.
परंतु, ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. अनेक गावांतील नागरिक रेशन दुकानासमोर नारे देत शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र गावागावांत पाहायला मिळत आहे.
गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात अथवा मोफत रेशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. रोजंदारीवर कामाला जाणारे कार्डधारक सकाळी ७ वाजेपासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात. दुकानात धान्य साठा शिल्लक असून सुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही. यामुळे दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले आहेत.
मुदत वाढविण्यासाठी पाठविले पत्रई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत जुलै महिन्यातील धान्यवाटपाची मुदत वाढवून देण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल. कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.