यवतमाळ : रास्त भाव धान्य दुकानदाराने धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशीच वाद घातला. ग्र्र्राहक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गावाकडे परत येत असताना त्याचा रस्त्यातच अडवून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.सचिन सुत्रावे व प्रवीण पोटे रा. माळम्हसोला, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. माळम्हसोला येथील अजित चव्हाण हा २३ आॅगस्ट २०१५ रोजी गावातील रास्त भाव धान्य दुकानात गेला होता. तेथे त्याचा दुकानदार राजेश चव्हाण याचेशी वाद झाला. या घटनेची तक्रार करण्यासाठी अजित चव्हाण दुचाकीने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. तेथून गावाकडे परत जाताना अजितला अर्जुना घाटात अडवून त्याच्यावर दोघांनी हल्ला केला. यात अजितचा जागीच मृत्यू झाला. यावेळी अजितची पत्नी घटनास्थळावर उपस्थित होती.या घटनेची अजितच्या पत्नीने केट्रोल डिलर राजेश चव्हाण, सचिन सुत्रावे, प्रवीण पोटे व विधिसंघर्षग्रस्त बालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक समाधान धंदरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.या खटल्यात प्रमुख सत्र न्यायाधीश संदीपकुमार मोरे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. त्यापैकी मृतकाची पत्नी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरत प्रवीण पोटे व सचिन सुत्रावे या दोघांना जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील निती दवे व सहायक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली.