लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रेशनच्या दुकानातून तांदूळ खरेदी करुन काळ्या बाजारात त्याची विक्री केली जाते. हा तांदूळ जमा करण्यासाठी रेशन माफिया काल्याने दोन दहाचाकी ट्रक, दोन मेटॅडोअर, बोलेरो पीकअप अशी वाहने खरेदी केली आहे. शहरात त्याच्या पंटरने जमा केलेला तांदूळ थेट प्रक्रियेसाठी नेला जातो. या तांदळावर घातक रसायनाचा प्रयोग करण्यात येतो जेणे करून हा तांदूळ चांगल्या दर्जाच्या तांदळात भेसळ करण्यासाठी याचा वापर होतो. यातून मोठी आर्थिक रसद रेशन माफियाला मिळत आहे. काल्या या काळ्या धंद्यातील एक कडी आहे. त्याच्या मागचे नेटवर्क बरेच मोठे असून तो प्रशासकीय यंत्रणेलाही जुमानत नसल्याची भाषा उघडपणे बोलतो. काल्याने अवैधपणे थाटलेल्या राईस मिलमध्ये घातक प्रयोग केले जातात. हा तांदूळ प्रक्रिया करून गोंदियाला पाठविण्यात येतो. तेथे त्याची भेसळ होते. वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. वर्धेतही नागपूर बायपासवर काल्याने गोदाम थाटले आहे. तेथे वर्धा तालुक्यातील रेशनचा तांदूळ गोळा केला जातो. वाहतुकीसाठी गोंदिया येथील राईस मिलचे बिल सोबत बाळगले जाते. काल्याने या व्यवसायात स्वत:सोबतच भाच्यांनाही उतरविले आहे. स्थानिक यंत्रणेला दावणीला लावल्याने त्याला कुणाचीही भीती नाही. रेशनच्या तांदळाचा काळ्या बाजार करणाऱ्याला अभय देणारी यंत्रणा स्वत:चाच घात करीत आहे. घातक रसायन लावलेले तांदूळ सुगंधित म्हणून भेसळ केले जाते. हा तांदूळ अनावधानाने आपणही सेवन करतो. त्यातील फरक ओळखता येत नाही. समाजाच्या स्वास्थ्यासाठी रेशनच्या तांदुळाचा काळा बाजार थांबणे गरजेचे झाले आहे. घातक रसायनामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार सातत्याने वाढत आहे. त्याला रेशनचा तांदळाचा काळा बाजार व त्याची होणारी भेसळ हेही पूरक ठरत आहे.
काळ्या बाजाराचे कनेक्शन गुजरातपर्यंत- रेशनचा काळा तांदूळ मिसळ करून त्याचे ट्रक गुजरातपर्यंत पाठविले जातात. मध्यंतरी या प्रकरणात एक ट्रक परस्पर विकल्या गेला हेाता. तांदळाचा काळा बाजार फोफावत असून त्यामध्ये रेशनचा तांदूळ स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने तो विविध राज्यांमध्ये भेसळ करून पाठविला जातो. याचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे.
काल्याचा करवीता धनी कोण ?- संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मॅनेज करण्यात काल्याला कुणाची साथ लाभते हे खरी शोधण्याची गरज आहे. काल्याचा करवीता धनी कोण हे रेकॉर्डवर आल्यावरच रेशनच्या काळ्या बाजाराचा चिठ्ठाबट्टा बाहेर येणार आहे. यवतमाळ शहराच्या बायपास परिसरात वाहनातून रेशनचा तांदूळ उतरवून माफियाच्या वाहनांमध्ये भरला जातो. यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.