यवतमाळ : लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिन्यांपासून दारू दुकाने बंद आहे. जणू याचाच फायदा उठवित एका वाईन शॉपमध्ये उदरांंनी प्रचंड धुडगूस घातला. दारूच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स कुरतडल्याने त्यातील दारूचे अक्षरश: पाट वाहले. गेल्या दोन महिन्यात उंदरांनी दीड ते दोन लाख रुपये किंमतीची दारू सांडवून नष्ट केल्याचे सांगितले जाते.
लॉकडाऊन काळात बीअरबार, वाईन शॉप, बीअर शॉपी, गोदाम येथून छुप्या मार्गाने दारू काढून ती शौकिनांना तिप्पट-चौपट दराने विकली गेल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यात दारू साठ्यात तफावत आढळली. जिल्हाधिकाºयांनी आतापर्यंत १९ परवाने कायमस्वरूपी निलंबित केले. तर आणखी दहा प्रकरणे त्यांच्या पुढे आहेत. याशिवाय आणखी सहा देशी दारू व वाईन शॉपची प्रकरणे कारवाईसाठी जिल्हाधिकाºयांकडे दाखल केली जाणार आहे. एका बारमालकाने आर्णी रोडवरील कॅम्पमध्ये राहणाºया ‘विशाल’च्या माध्यमातून १३ लाख रुपयांची दारू विकली.
लॉकडाऊन काळात चोरट्या मार्गाने दारू काढून जादा भावात विक्री करणाºया बीअरबार, शॉप-शॉपीवर कारवाईची प्रतीक्षा असतानाच यवतमाळात उंदरांनी वाईन शॉपमध्ये धुडगूस घातल्याचे एक मजेदार प्रकरण पुढे आले आहे. शहराच्या हृदयस्थळापासून नजीकच्या असलेल्या एका वाईन शॉपमध्ये हा प्रकार घडला. लॉकडाऊन असल्याने गेली कित्येक दिवस हे शॉप उघडले गेले नाही. या काळात या शॉप व गोदामातील दारू उंदरांनी नष्ट केली. दारूचे बॉक्स कुरतडून व त्यातील प्लॅस्टिकच्या बॉटल्स कुरतडून दारू जमिनीवर सांडविण्यात आली. त्यात अनेक महागड्या दारू बॉटल्सचाही समावेश आहे. दीड ते दोन लाख रुपये किंमतीची दारू उंदरांनी नष्ट केली. कदाचित या दारूवर पाणी समजून उंदरांनीही ताव मारला असण्याची शक्यता आहे. अलिकडेच वाईन शॉप उघडले असता उंदरांनी दारू नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची लिकर लॉबीत चर्चा आहे.
लिकर लॉबीत शंकेचा सूरउंदरांनी दोन लाखांची दारू नष्ट केली, हे सांगण्यामागे काही खेळी तर नाही ना, दारू विकली तर गेली नाही ना, उंदरांनी नष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा अधिकपट ती दाखविली गेली नाही ना, अशा अनेक शंका लिकर लॉबीतूनच व्यक्त केल्या जात आहे. तर प्रत्यक्षदर्शी उंदरांनीच दारू नष्ट केल्याचे सांगत आहे.