राजेश निस्ताने यवतमाळ प्रचंड परिश्रम घेऊनही लोकसभा निवडणुकीत वसंत पुरके काँग्रेसला मतांची आघाडी मिळवून देऊ शकले नाही. तेथे शिवसेनेला तब्बल २७ हजारावर मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेसची हुरहूर वाढली आहे. विधानसभेच्या राळेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे वसंत पुरके करीत आहे. शिक्षण खात्याची धुरा सांभाळलेल्या पुरकेंना पक्षाने नाराज न करता विधानसभेचे उपाध्यक्षपद बहाल करून पुन्हा लालदिवा दिला. राळेगाव मतदारसंघात सलग दहा वर्षांपासून लालदिवा चमकत असला तरी त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचा मतदारांचा सूर आहे. आजही मतदार पुरके सरांनी मतदारसंघासाठी काय केले, असा सवाल करीत आहे. एकही मोठा प्रकल्प न आणल्याने बेरोजगारांची समस्या कायम आहे. प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांची अवस्थाही जैसे थे आहे. आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांना लोकसभेत पाठवून राज्यमंत्री मंडळाची वाट आपल्यासाठी कायमची मोकळी करून घेण्याचा पुरकेंचा मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. परंतु लोकसभा निवडणुकीत कुणीच पुरकेंचे ऐकले नाही. पर्यायाने भावना गवळींची गेल्या वेळी असलेली मतांची आघाडी किंचितही कमी होऊ शकली नाही. मतदारांनी ‘हात’ दाखविल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हीच स्थिती विधानसभेत तर राहणार नाही ना, या चिंतेने पुरके समर्थकांना ग्रासले आहे. महायुतीकडे सक्षम उमेदवार नसणे ही पुरकेंसाठी जमेची बाजू आहे. परंतु कळंब, बाभूळगाव, राळेगाव या तीनही तालुक्यातील मतदारात ‘आता यांना पाडा रे’चा नारा लावला जात आहे. एकदा चेंज करू, त्याला न जमल्यास पुन्हा जुनाच चेहरा देऊ, अशा मानसिकतेत मतदार आले आहे. विक्रीकर खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्यानेही लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या आघाडीचा आकडा पुढे करून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यामुळे पुरकेंना मतदारसंघातच पर्याय उभा झाला आहे. एखादवेळी पुरके विरोधकांसाठी हा तिसरा सक्षम पर्याय ठरू शकतो. या अधिकाऱ्याच्या गाडीमध्ये पुरके विरोधक आणखी किती दिवस फिरतात, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीकडून प्रा. अशोक उईके यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी पहिली निवडणूक शिवसेनेकडून तर दुसरी अपक्ष म्हणून लढविली होती. हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहे. गेल्या वेळी आयपीएस अधिकारी बाबासाहेब कंगाले यांना भाजपाने रिंगणात उतरविले होते. यावेळी भाजपाचा उमेदवार मीच असा दावा करित उईके मतदार संघात फिरत आहेत. गतवेळच्या २० लाखांच्या खर्चाचे भांडण अद्याप न मिटल्याने राष्ट्रवादीचा गट कुणाकडे राहतो, हे पाहणे महत्वाचे आहे. ही रक्कम देऊन मनोमिलन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुरकेंना प्रखर विरोध करणारा राळेगावातील गट महायुतीच्या उमेदवाराला किती ताकद देतो यावर काँग्रेसचे गणित अवलंबून आहे. मात्र पुन्हा उईके नकोच, यावेळी नवा चेहरा देऊ असे म्हणणारा एक गटही भाजपात आहे. भाजपाकडून एका जिल्हा परिषद सदस्याचे नावही चर्चेत आहे. काँग्रेसच्या गोतावळ्यात सामान्य कार्यकर्ते दूर आणि कंत्राटदारांचीच चालती असल्याने निष्ठावान नाराज आहेत. पुरकेंच्या भेटीसाठी आधी कुण्याही नंदीचे आधी दर्शन घ्यावे लागत नाही, ही त्यांची जमेची बाजू सांगितली जाते. अशोक उईके यांनी लोकसभा निवडणुकीत भावना गवळींसोबतच विधानसभेसाठी स्वत:लाही प्रोजेक्ट करण्याची संधी सोडली नाही. भावना गवळींबाबत प्रचंड नाराजी असूनही मतदारांनी त्यांनाच तब्बल २७ हजार मतांची आघाडी दिली. पुरके आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरुन आणि शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करूनही मतदारांनी प्रतिसाद न दिल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. काँग्रेस आणि शिवसेना अशी थेट लढत झाल्यास पुरकेंपुढील अडचणी वाढणार आहे. आता कोण सक्षम अपक्ष उमेदवार पुरकेंच्या मदतीला धावून येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राळेगाव मतदार संघातील तमाम पुरके विरोधकांनी सर्वसंमतीने एकच सक्षम उमेदवार रिंगणात उतरवायचा आणि तोही भाजपाकडून अशी रणनीती आखली आहे. या व्यूहरचनेला भाजपा श्रेष्ठींनीही हिरवा कंदील दाखविल्याचे बोलले जाते. त्यामुळे ऐनवेळी एखादा अनपेक्षित चेहरा पुढे येण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभेतील पिछाडीने पुरकेंची हुरहूर वाढली
By admin | Published: June 14, 2014 2:28 AM