तडजोड शुल्क : अवैध वाहतुकीच्या ३७१ केस दाखल, मद्यपी वाहनधारकांविरूद्ध कारवाईवणी : येथील पोलीस वाहतूक शाखेने गेल्या चार महिन्यात तब्बल नऊ लाख ४८ हजार रूपये विविध वाहनधारकांकडून वसूल केले. यासोबतच अवेध प्रवासी वाहतुकीच्या ३७१ केस करून वाहनधारकांविरूद्ध गुन्हे दाखल केले.वणी येथे वर्षभरापूर्वी स्वतंत्र वाहतूक शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेअंतर्गत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील पाच पोलीस ठाणे येतात. या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या चार महिन्यात वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवून विविध वाहनधारकांकडून तडजोड शुल्क म्हणून तब्बल नऊ लाख ४८ हजार ६०० रूपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे. तब्बल नऊ हजार ७३० वाहनधारकांकडून हे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. यासोबतच वणी, मारेगाव, मुकुटबन, शिरपूर व पाटण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतुकीच्या ३७१ केसेस करण्यात आल्या आहे. आता नुकत्याच शाळा लागल्या आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरूद्ध मोहीम उघडली आहे. सर्व शाळांना शालेय परिवहन समितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. जादा विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या वाहनधारकांविरूद्ध केस दाखल केल्या आहे. वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेचे दिलीप अडकीने, गोपाल हेपट, पंकज उंबरकर, आशिष टेकाळे, डाखोरे, खंदारे आदींनी कारवाई पार पाडली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांनी परवान्यापेक्षा जादा विद्यार्थी नेऊ नये, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)६३ मद्यपींविरूद्ध कारवाईवाहतूक शाखेने गेल्या चार महिन्यात डंकन ड्राईव्ह अंतर्गत ६३ वाहनधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारच्या केसेस वाढल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यामुळे या प्रकारात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाहनधारकांकडून १० लाखांचा दंड वसूल
By admin | Published: July 04, 2015 2:52 AM