यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे कामकाज गत काही महिन्यांपासून ‘रेफर टू’ सुरू आहे. दोन महिन्यातर येथे एकही अस्थिरुग्णावर शस्त्रक्रिया झाली नाही. याचे कारण म्हणजे शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सी-आर्म मशीनच बंद आहे. अस्थिव्यंग अथवा अस्थिभंग झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी सी-आर्म ही मशीन अत्यावश्यक आहे. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागात दोन सी-आर्म मशीन आहेत. या पैकी एक मशीन वर्षभरापूर्वीच निर्लेखित करण्यात आली. एकाच मशीनच्या सहायाने कामकाज सुरू होते. गेल्या दोन महिन्यापासून ही मशीनही बंद पडली. त्यामुळे रुग्णावर शस्त्रक्रियाच केल्या जात नाही. सी- आर्म मशीन ही शस्त्रक्रिया करतांना नेमकी त्या भागाची स्थिती दाखविण्यास मदत करते. बरेचदा अनावश्यक जखमा टाळून शस्त्रक्रिया करता येतात. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. अस्थिभंग झालेले नेमके ठिकाण पाहून त्या ठिकाणी रॉड टाकणे, कुत्रिम हाड बसविणे शक्य होते. त्यासाठी शस्त्रक्रिया करताना सी- आर्म हे मशीन अत्यावश्यक आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून ही मशीन बंद असल्याने अस्थिभंग झालेल्या रुग्णाला नागपूर येथे रेफर करण्यात येत आहे. अनेक रुग्णांची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला जाणे परवडत नाही. अपघातग्रस्त रुग्णांवर येथे अकस्मात स्थितीत उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने सी-आर्म मशीन सुरू करण्याबाबत पाठपूरवा केला जात नाही. हा प्रकार रुग्णांच्या जिवावर बेतणारा आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक यंत्रे बसविण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश यंत्रे उपयोगातच आणली जात नाही. गोरगरीब रुग्णांवर तर वेळेवर उपचार होताना दिसत नाही. अस्थीरोग विभागातही अशीच अवस्था आहे. दररोज अपघात आणि विविध कारणांनी अस्थीभंग झालेले रुग्ण या ठिकाणी दाखल होतात. अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. मात्र येथील सी-आर्म मशीन बंद असल्याने शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. अशा रुग्णांना खासगी किंवा नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला जातो. किरकोळ शस्त्रक्रियेसाठीही नागपूरला जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सी-आर्म मशीन सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली दोन महिन्यात केल्या नसल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
‘मेडिकल’च्या अस्थिरूग्ण विभागाला ‘रेफर टू’ची लागण
By admin | Published: January 12, 2015 10:59 PM