मुकेश इंगोले
यवतमाळ - तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलल्याने त्यांना अनेक लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पायलट स्किम अंतर्गत मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ चे कलम १६४ (३) अन्वये भूमिधारी धारणाधिकाराकाराने किंवा हस्तांतरणाच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कान्वे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटदार वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या वतीने कार्यक्रम राबविण्यात आला. ज्या नागरिकांकडे मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ च्या तरतुदीनुसार जमीन वाटप केल्याचा पुरावा, सनद, हक्क नोंदणी आदी कागदपत्रे उपलब्ध आहे त्यांच्या जमिनीचा वर्ग बदलण्याची कार्यवाही करण्यात आली.
तालुक्यातील राजुरा, कुऱ्हाड, कुंड, साजेगाव, ब्रह्मनाथ, निळोण, शिंदी, तळेगाव, इरथळ, मांगकिन्ही, हरू, उमरी, ईजारा, वागद (खु.), लोही, सेवादासनगर, जवळा, शेलोडी, गणेशपूर, सावळी, दुधगाव, वाकी,महागाव(क.), चिकणी, लाखखिंड, वडगाव(आंध), मोझर तरोडा, सावळी, पळशी या तीस गावातील २६८ शेतकऱ्यांची ७३० हेक्टर जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यात आली. यापूर्वी या सर्व शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते. परंतु २१ एप्रिल २०१८ च्या शासन राजपत्रांन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २९ मध्ये सुधारणा करण्यात आली. कलम २९ चे पोटकलम (३) खंड (ब) उपखंड (एक) वगळण्यात आल्यामुळे शेतजमिनीच्या वर्गात हा बदल करण्यात आला असून याचे अनेक फायदे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दारव्हा तालुका जिल्ह्यात अव्वल
विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या शेतजमिनीच्या वर्गांमध्ये बदल करण्यात आला असला तरी याबाबतीत दारव्हा तहसील कार्यालयाची कामगिरी जिल्ह्यात अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने महसूलच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे.