यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खेळ व क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाही घेतल्या जात आहेत. मात्र केंद्र स्तरीय स्पर्धेसाठी निधीच नाही. तर तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी अपुरा निधी मिळत असल्याने यजमान शाळांनाच लोकवर्गणी करून स्पर्धा घ्यावी लागत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत निधीची मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये साधारणत: एक लाख ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी सांघिक व वैयक्तिक क्रीडा सामने, तसेच त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाही केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर घेतल्या जातात. स्पर्धेची पहिली फेरी केंद्र स्तरावर होत असून स्पर्धेकरिता कोणताही निधी उपलब्ध होत नाही. शिक्षकांकडून वर्गणी करून तसेच शाळा संलग्नता फी संकलीत करून गोळा होणाऱ्या निधीतील ५० टक्के रक्कम खर्च करून सामने पार पाडले जातात. तसेच शाळांकडे खेळ व क्रीडा यासाठी स्वतंत्र निधी नसतो. मैदान तयार करणे, खेळ साहित्य खरेदी, उद्घाटन कार्यक्रम, पारितोषिक हा खर्च आयोजक शाळेला करावा लागतो. त्यासाठी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
दुसऱ्या फेरीचे आयोजन तालुका स्तरावर केले जाते. तालुक्यातील एखाद्या केंद्रातील शाळेला यजमान पद देऊन आयोजन केले जाते. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रत्येक केंद्राची चमू स्पर्धेत सहभागी होत असून सुमारे दोन हजार खेळाडू विद्यार्थी सहभागी होतात. यावेळी उद्घाटन, चहापान, पारितोषिक, क्रीडा साहित्य खरेदी, मंडप, लाउडस्पीकर, पाणी आदी खर्चासह विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. जिल्हा स्तरावरुन उपलब्ध होणाऱ्या ५० हजार रुपयांत सदर खर्च भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षकांसह सामान्य नागरिकांकडून लोकवर्गणी केली जाते. क्रीडा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धेकरिता दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने सीईओ डाॅ. मैनाक घोष यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर, सुभाष पारधी, संदीप टुले आदी उपस्थित होते. प्रत्येक केंद्राला १० हजार, तालुक्याला दीड लाख द्यासन २०१७ पर्यंत केवळ सांघिक खेळ घेतले जात होते. पण आता वैयक्तिक क्रीडा प्रकारांचाही समावेश करण्यात आला. कबड्डी, लंगडी व खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उडी, कॅरम, बॅडमिंटन, भालाफेक, थाळीफेक, टेनिक्वाइट, योगासने आदी स्पर्धा घेण्यात येत आहेत. परंतु, केंद्रस्तरीय सामन्यांसाठी कोणताही निधी मिळत नाही. तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा सामन्यांचे आयोजन सध्यस्थितीत उपलब्ध होणाऱ्या निधीत कठीण जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्राला १० हजार रुपये व तालुका स्तरीय स्पर्धेला दीड लाख रुपये अनुदानाची तरतूद जिल्हा परिषद निधीतून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.