मंगेश बनसोड : यवतमाळात सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन यवतमाळ : आंबेडकरी हा शब्द एका महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला आहे. हे तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पीडित, शोषित, वंचित घटकांसाठी मुक्तीचे महाव्दार बनले आहे. १४ आॅक्टोबर १९५६ च्या आधीची सर्व मानसिक अवस्था आणि बौद्धीक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी असणे होय, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड यांनी केले. सातव्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्यावतीने आयोजित संमेलनाचे येथील संदीप मंगलममध्ये दुपारी १ वाजता प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रोहीत वेमुला परिसर, नामदेव ढसाळ नगरी आणि अरुण काळे विचार मंच अशा नामकरणातून संमेलनस्थळाची वैचारिक बांधिलकी स्पष्ट करण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड म्हणाले, दलितेतर विविध राजकीय पक्ष विविध विचारसरणी घेऊन काम करतात. बरेचदा एकाच घरातील वेगवेगळे सदस्य वेगवेगळ््या राजकीय पक्षाचे काम करतात. मात्र निवडणुकांमध्ये हे राजकीय पक्ष एकत्र येतात. विशेष म्हणजे दलित विचारधारा मानणारे आपले पक्षही सत्तेसाठी विविध राजकीय पक्षांसोबत ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’च्या नावावर युती करतात. परंतु दलित विचारधाराचे देशभरातील सर्व पक्ष असा ‘कॉमन मिनीमम प्रोग्राम’ करून एकत्र का येत नाही? या पुढील काळात आंबेडकरी युवकांनी या दृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. बनसोड यांनी केले. प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद शिंदे ओघवत्या शैलीत म्हणाले, भूमिका करणारे अनेक नट आहेत. मात्र मी ठराविक ‘भूमिका’ असणारा नट आहे. अशा संमेलनात आले म्हणजे आपण आणखी वाचन केले पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव होते. समाजात दंगल होऊ न देणे, ही प्रत्येक कलावंताची जबाबदारी आहे. आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष महेंद्र भवरे यांनी धर्माधिष्ठीत व्यवस्था आंबेडकरी चळवळ नाकारत असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय इतिहास जमा करणारे वातावरण सध्या दिसते. विचारवंतांना संपविण्याचा घाट घातला जात आहे. समूहाचे दु:ख ही संकल्पना आज बाद झाली, असे ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, जगण्यातले सगळे संदर्भ साहित्यात रुजविले तरच भावी पिढी भक्कमपणे उभी राहील. प्रा. माधव सरकुंडे यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता आंबेडकरी विचार हाच पर्याय असल्याचे सांगितले. साहित्य हे लोकमनाला प्रशिक्षण देते. अनेक परदेशी सेवक आम्हाला ख्रिस्ती करतात, कुणी आम्हाला वनवासी करतात. त्यामुळे आता आंबेडकरी विचार स्वीकारून आमचा विकास झाला पाहिजे. प्रा. सतेश्वर मोरे म्हणाले की, आमच्या साहित्याचे प्रयोेजन धम्मासाठी आहे. आणि धम्माचे प्रयोजन जगपरिवर्तन आहे. विचारपीठावर स्वागताध्यक्ष निबंधक नंदकुमार रामटेके, सिद्धार्थ मोकळ उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद गायकवाड, संचालन सुनील वासनिक यांनी केले. सुनील भेले यांनी संदेश वाचन केले. कवडू नगराळे यांनी पाहुण्याचा परिचय, तर बळी खैरे यांनी भूमिका विषद केली. यावेळी योगानंद टेंभूर्णे यांच्या युगांतराच्या उजेडवाटा पुस्तकाचे प्रकाशन झाले. तत्पूर्वी घनश्याम पाटील आणि संचाने क्रांतीगीते सादर केली. (स्थानिक प्रतिनिधी) कवितेने मन साफ होते - लोकनाथ यशवंत संमेलनाचे उद्घाटक लोकनाथ यशवंत म्हणाले, तथाकथीत भारतीय साहित्य जागतिक पातळीवर कधीच पोहोचू शकत नाही, कारण ते जातीच्या मर्यादेतच गुरफटलेले आहे. इतर कला प्रकार महागडे असले तरी कविता पैसे मागत नाही. कवितेतून मनातली भडास निघते. मन साफ होते आणि आरोग्य ठणठणीत राहते. आपल्या पोटातले मुल महान बनूनच जन्मास यावे, असे प्रत्येक आईला वाटते. कवीनेही स्वत:च्या कवितेबद्दल हिच भावना ठेवली तर दर्जेदार काव्यनिर्मिती होईल, असे यशवंत यांनी सांगितले.
बौद्धिक गुलामगिरी नाकारणे म्हणजे आंबेडकरी असणे
By admin | Published: February 27, 2017 12:50 AM