तीन अत्यवस्थ : ट्रकसह दोघे पोलिसांच्या ताब्यात यवतमाळ : ट्रकमध्ये अमानुषपणे कोंबून कत्तलीसाठी तेलंगणामध्ये घेऊन जाणाऱ्या २० बैलांची वडगाव रोड पोलिसांनी सुटका केली. भोसा नाका येथील तात्पुरत्या पोलीस चौकीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना संशय आल्याने गुरुवारी पहाटे ५.३० वाजता त्यांनी ट्रक थांबविला. तपासणी केली असता त्यामध्ये बैल कोंबलेले आढळून आले. त्यानंतर वडगाव रोड पोलिसांनी ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले. हिंगणघाट येथून बुधवारी रात्री एम.एच-३४-एव्ही-०५१८ या ट्रकमध्ये २० बैल कोंबण्यात आले. अक्षरश: गत प्राण होईल अशा स्थितीत हे बैल कोंबले होते. हा ट्रक घेऊन चालक साजीद शाह करीम शाह (२५), वाहक प्रशांत जुमनाके (२०) दोघे रा. गडचांदूर जि. चंद्रपूर हे यवतमाळवरून नांदेड मार्गे तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील साठापूर येथे घेऊन जात होते. दरम्यान भोसा येथील घाटंजी-आर्णी बायपासवर संशय आल्याने चौकीतील पोलीस शिपाई वैजनाथ पवार व श्याम घुगे यांनी हा ट्रक थांबविला. त्यामध्ये बैल कोंबल्याचे आढळून आले. याची माहिती वडगाव रोड पोलिसांना देण्यात आली. गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, उपनिरीक्षक उमेश नासरे, उपनिरीक्षक अलका गायकवाड, रावसाहेब शेंडे, सुरेश मेश्राम, नीलेश राठोड, आशिष चौबे, गौरव नागलकर यांनी घटनास्थळ गाठले. बैल भरलेला ट्रक गोधनीजवळच्या श्रीराम गो-शाळेत आणण्यात आला. येथील कर्मचारी परसराम गोविंदा मारेकर यांच्या मदतीने ट्रकमधून अक्षरश: गंभीर अवस्थेत बैलांना बाहेर काढण्यात आले. यातील तीन बैलांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, मोटारवाहन अधिनियम यातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. (कार्यालय प्रतिनिधी)
कत्तलीसाठी जाणाऱ्या २० बैलांची सुटका
By admin | Published: August 26, 2016 2:27 AM