क्राईम मिटिंग : पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कारयवतमाळ : गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते १२ एप्रिल रोजी गुन्हे आढावा बैठकीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे प्रामुख्याने उपस्थित होते. पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव, पोलीस शिपाई प्रमोद घोटेकर, वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस शिपाई सय्यद साजीद, पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू, जमादार संजय दुबे, ऋषी ठाकूर, गजानन अजमिरे, पोलीस शिपाई किरण पडघन, गजानन डोंगरे, हरीश राऊत, आशिष भुसारी, सहायक पोलीस निरीक्षक पतंगे, सहायक फौजदार साहेबराव राठोड, पोलीस कर्मचारी मो.शकील, वासू साठवणे, संदीप मेहेत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार राजू वाटाणे, सहायक फौजदार डबले, पोलीस शिपाई डोंगरे, राऊत, भगत, पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, दारव्हा येथील एसडीपीओ कल्पना भराडे, वसंतनगर-पुसदचे ठाणेदार सदानंद मानकर, खंडाळाचे ठाणेदार वडतकर आदींचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पांढरकवडा येथील संदीप मंगलम ढाब्याजवळ तामिडनाडूच्या ट्रक चालकाचा खून करण्यात आला. एसडीपीओ साहेबराव जाधव वेळीच पोहोचल्याने ट्रक पळविण्याचा मनसुबा उधळला गेला. या गुन्ह्यामागे तेथील अट्टल घरफोड्या शेख साजीद अब्दूल गफ्फार या टोळीचा हात असल्याचे पोलीस शिपायाने वेळीच ओळखल्याने निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यात वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांनी महत्वाची भूमिका बजावली. वणी येथे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, पोलीस शिपाई सय्यद साजीद यांच्या पथकाने अग्नीशस्त्राचा साठा जप्त केला. येथील नागपूर रोडवर जनावरे घेऊन जाणारा ट्रक शस्त्रासह कडू यांच्या पथकाने जप्त केला. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याला वॉन्टेड असलेल्या आरोपींना पतंगे यांच्या पथकाने अटक केली. फौजदार वाटाणे यांच्या पथकाने वडगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. खंडाळाचे ठाणेदार वडतकर यांनी पुसद विभागात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या व तीन कोटींच्या खंडणीसाठी खंडाळा घाटात पुसदच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या शेख मुख्तार शेख निजाम टोळीच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला. मोक्काच्या या गुन्ह्याचा एपीआय वडतकर यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र तयार केले. या कामी वडतकर यांना एसडीपीओ अश्विनी पाटील, कल्पना भराडे, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांची मोलाची मदत झाली. पोलीस अधीक्षकांनी क्राईम मिटींगमध्ये उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन केलेल्या सत्कारामुळे अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळाल्याची प्रतिक्रिया पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
डझनावर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
By admin | Published: April 16, 2016 1:51 AM