पुराची भीती : २००६ च्या पुनरावृत्तीची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कधनोडा : महागाव तालुक्यातील धनोडा येथून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर संरक्षक भिंत बांधण्यात सर्वांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. २००६ साली आलेल्या महापुराच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागपूर-बोरी-तळजापूर राज्य मार्गावरील धनोडा गाव पैनगंगा नदीच्या तीरावर आहे. उत्तरवाहिनी पैनगंगेला धार्मिक महत्त्वही आहे. नदीच्या तीरावर गाव असून पावसाळ्यात पैनगंगेच्या पुराचा फटका धनोडाला नेहमीच बसतो. २००६ साली महापूर आला होता. या पुरात संपूर्ण धनोडा उद्ध्वस्त झाला होता. त्यावेळी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा मुद्दा पुढे आला. विशेष म्हणजे त्याही पूर्वीपासून येथे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी आहे. परंतु आता दहा वर्ष झाले तरी संरक्षक भिंतीचा विषय कुणीही कानावर घेत नाही. आता पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. पुराच्या भितीने नागरिकांच्या मनात आतापासूनच धडकी भरत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे. नैसर्गिक संरक्षक थडी खचलीपैनगंगा नदीला नैसर्गिक संरक्षक भिंत अर्थात मोठी थडी आहे. परंतु गत काही वर्षापासून रेती तस्करांनी आपले वाहन नदीपात्रात उतरविण्यासाठी थडी ठिकठिकाणी खचविली आहे. या ठिकाणी निर्माण झालेल्या रस्त्यातून पुराचे पाणी सहज गावात शिरू शकते. रेती उत्खनन करणाऱ्या वाहनांना नदी पात्रात उतरण्यास बंदी आणावी, अशी मागणी आहे.
धनोडा येथे संरक्षक भिंत बांधण्याचा पडला विसर
By admin | Published: May 26, 2017 1:20 AM