तिसरा टप्पा : बसस्थानक ते स्टेट बँक चौक आणि कॉटन मार्केट परिसरात कारवाईयवतमाळ : नगरपरिषदेने अतिक्रमण हटाओ मोहिमेचा तिसरा टप्पा बुधवारी राबविला. या अंतर्गत येथील बसस्थानक चौक, स्टेट बँक चौक, कॉटन मार्केट परिसरातील अतिक्रमण काढले. ३० अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आला, तर बहुतांश व्यावसायिकांनी स्वतहून अतिक्रमण काढून पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य केले. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पालिकेने ही मोहीम व्यापक करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढले. कॉटन मार्केट परिसरात वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या झोपड्या वजा घरे अंशता पाडण्यात आली. कॉटन मार्केटला लागून असलेले अतिक्रमणात असलेले हॉटेल्स पाडण्यात आले. स्टेट बँक चौक ते बांगरनगर रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. बसस्थानक चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी बुलडोजर चालताच व्यावसायिक तेथून निघून गेले. बसस्थानकाच्या सुरक्षा भिंतीलगत असलेले अतिक्रमीत दुकाने हटविण्यात आली. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत असलेले पानठेले हटविण्यात आले. शिवाजी गार्डनकडे जात असलेल्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. आर्णी रस्त्यावर अभ्यंकर कन्या शाळा आणि विद्युत कंपनीच्या कार्यालयासमोर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे दिवसभर अतिक्रमणग्रस्तांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत होता. शहराच्या विविध भागात टप्प्या टप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची कारवाई सुरू आहे. (शहर वार्ताहर)
शहरातील २०० अतिक्रमणे काढली
By admin | Published: January 14, 2016 3:16 AM