जिल्हा परिषद : कार्यमुक्तीस टाळाटाळ यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात बदली होऊनही काही मातब्बर कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल केली जात असल्याने बदली होऊन गेलेले कर्मचारी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत दरवर्षी उन्हाळ्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. सेवाज्येष्ठता, एकच ठिकाण, एकच पंचायत समिती, एकच विभाग आदी निकषानुसार बदल्यांची यादी प्रसिद्ध होते. त्याप्रमाणे याहीवर्षी उन्हाळ्यात अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर समुपदेशनाचा भर होता. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीची पंचायत समिती निवडून आपली वर्णी लावून घेतली. मात्र काही मातब्बर कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या ठिकाणी बदल्या झाल्याने त्यांनी बदलीच्या जागी रूजू होण्यास टाळाटाळ केली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पंचायत, सामान्य प्रशासन आदी विभागात सध्या बदली झालेले काही मातब्बर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना कार्यमुक्तच करण्यात आले नाही. परिणामी बदली होऊनही अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहेत. यामुळे बदलून गेलेले कर्मचारी संतप्त झाले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच न्याय का नाही, असा त्यांचा सवाल आहे. अनेक कर्मचारी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर रूजू झाले. मातब्बर कर्मचारी मात्र कुणाच्या तरी आशीर्वादामुळे अद्याप जुन्याच ठिकाणी कार्यरत आहे. याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी) पंचायतमध्ये प्रतिनियुक्ती पंचायत विभागामधील काही कर्मचाऱ्यांची बदली झाली होती. त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. ते बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नाही. अद्यापही ते तेथेच कार्यरत आहे. विशेष म्हणजे त्यातील काहींनी लगेच आपली जुन्याच पदावर प्रतिनियुक्ती करवून घेतली. अधिकाऱ्यांनीही त्यांना लगेच प्रतिनियुक्ती दिली. त्यांना प्रतिनियुक्तीच द्यायची होती, तर आधी बदलीच का करण्यात आली, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
बदली झालेले कर्मचारी ठाण मांडून
By admin | Published: August 03, 2016 1:29 AM