खर्याच्या पन्न्यांचा सर्रास वापर
पांढरकवडा : शहरात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्न्यांचा वापर वाढला आहे. यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत आहे, तसेच अनेक जनावरेसुद्धा या पन्न्या खात असल्याने त्यांचेही जीवन धोक्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी चौकाचौकांत या पन्न्यांचे ढीग आढळून येतात. त्यामुळे नगरपालिकेच्या पथकाने याकडे लक्ष देऊन पन्न्या वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालयासमोरील रस्ता दयनीय
वणी : शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, या रुग्णालयात ये- जा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. थोडा जरी पाऊस आला तरी या रुग्णालयासमोर पाण्याचे डबके साचते. त्यामुळे तेथून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न पडतो. अनेकांना कसरत करत तेथून मार्गक्रमण करावे लागते.